जुन्या आठवणी जपण्यासाठी गावांना जवळ करा
By Admin | Updated: January 12, 2016 00:54 IST2016-01-12T00:54:31+5:302016-01-12T00:54:31+5:30
आपला जन्म ज्या गावात झाला, ज्या गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले,

जुन्या आठवणी जपण्यासाठी गावांना जवळ करा
सुधीर मुनगंटीवार : वढोलीत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
चंद्रपूर: आपला जन्म ज्या गावात झाला, ज्या गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले, त्याच गावात बालपणी पुढील आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळाली व आपले संपूर्ण आयुष्य सत्कर्मी लागून आपण सुख समाधानाने जीवन व्यतीत करीत आहोत, त्याच गावातील आपल्या बालपणीच्या बालमित्रांची गळाभेट घेऊन एकमेकांच्या भावना जाणून घेण्याची संधी अशाप्रकारच्या माजी विद्यार्थी मेळाव्यातून व स्नेहमिलन सोहळ्यातून सहज शक्य होते. त्यासाठी प्रत्येकांनी जन्मगावाला जवळ करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पंचायत समिती चंद्रपूर अंतर्गत पद्मापूर बीट व केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ५० वर्षे पूर्ण झाले. वढोली शाळेचे मुख्याध्यापक शुद्धोधन रुमाजी मेश्राम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व शाळेच्या सूवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोकसहभागातून संपन्न झालेल्या माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहमिलन सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
स्नेहमिलन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समिती सभापती देवराव भोंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समितीचे सदस्य शांताराम चौखे, माजी जिल्हा परिषद सदस्य हंसराज रायपूरे, भवानी कन्स्ट्रक्शन चंद्रपूरचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ता रामपाल सिंग, दर्शन इरेक्टर्स चंद्रपूरचे संचालक शैलेंद्र कास्टीया, सोनू नागरकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, चंद्रपूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी राजू आनंदपवार, गट ग्रामपंचायत पायली, भटाळीचे सरपंच मनिषा विनोद थेरे, उपसरपंच राजकुमार रायपूरे, ग्रा.पं. सदस्य सुजाता राजू सागोरे, हनुमान मडावी, कुंदा रामटेके, मनिषा गेडाम, पांडुरंग राजूरकर, राकेश गौरकार, बाबुराव मडावी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन वढोली शाळेचे मुख्याध्यापक शुद्धोधन मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक विनोद थेरे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)