वीज केंद्रातील एक संच बंद करा

By Admin | Updated: November 7, 2015 00:43 IST2015-11-07T00:43:29+5:302015-11-07T00:43:29+5:30

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. २ हा प्रदूषणाच्या मापदंडापेक्षा अधिक प्रदूषण करीत असल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

Close a set of power stations | वीज केंद्रातील एक संच बंद करा

वीज केंद्रातील एक संच बंद करा

संच अति प्रदूषित : प्रदूषणविषयक संमती मूल्यांकन समितीचे आदेश
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. २ हा प्रदूषणाच्या मापदंडापेक्षा अधिक प्रदूषण करीत असल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. चंद्रपुरातील विविध सामाजिक तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाशी निगडित असलेल्या संस्था व संघटना सदर केंद्र तातडीने बंद करण्याची मागणी सातत्याने करीत होते. या मागणीची दखल घेऊन प्रदूषणविषयक संमती मूल्यांकन समितीने हा संच बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
या संचामुळे होत असलेल्या प्रदूषणाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करुन हे संच तातडीने बंद करण्याच्या आवश्यकतेवर भर देऊन तसे निर्देश या समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना प्रदूषण नियंत्रण व पर्यावरणविषयक आढावा बैठकीत देण्यात आली. यावेळी ना. अहीर यांनी संच क्र. २ बंद करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.
अहीर यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रास आकस्मिक भेट देऊन अतिप्रदूषित असलेल्या या संचाची पाहणी केली होती. तसेच या संचामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या तीव्रतेची माहिती घेतली होती. केंद्रीय मंत्री महोदयांच्या या भेटीची गांभीर्याने दखल घेवून उपरोक्त निर्णयाप्रत संमती मुल्यांकन समिती पोहचली असून सदर संच बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
या आढावा बैठकीत भद्रावती तालुक्यातील चारगाव व तेलवासा या गावांना प्रत्यक्ष भेट देवून वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे तेथील घरांना पडलेल्या भेगांची पाहणी करुन या संबंधातील अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही अहीर यांनी संबंधित अधिकारी व जिल्हा प्रशासनास दिले. प्रशासनाने अहवाल सादर केल्यानंतर आपण ब्लास्टिंगबाबत वेकोलि अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रकार थांबविण्याच्या सूचना करु, असेही ते म्हणाले. यावेळी अंबुजा सिमेंट उद्योगाद्वारे जाळण्यात आलेल्या विघातक रासायनिक पदार्थाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने या गंभीर प्रकरणाची चौकशी करुन नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी याच उद्योगाने आपल्या कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी ट्युबवेलची निर्मिती केल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या विहीरी तसेच ट्युबवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याने त्याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या आढावा बैठकीत ना. अहीर यांनी इरई नदीचे संरक्षण व संवर्धनासाठी वेकोलि प्रबंधनाद्वारा स्थानिक पठाणपुरा गेटच्या बाहेरील इरई नदीचे पात्र वळविले असल्याने या नदीचे अस्तित्व धोक्यात असून याबाबत जिल्हा प्रशासनाने मोक्का चौकशी करुन नदीचे अस्तित्व बचावण्यासाठी कडक उपाययोजना अंमलात आणाव्यात असे निर्देश दिलेत.
या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी.एम. जोशी, पर्यावरण तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे, प्रा. सचिन वझलवार, भाजपाचे जिल्हा सचिव राहुल सराफ, ओम मांडवकर, मनपाच्या झोन सभापती अंजली घोटेकर, सुभाष कासनगोट्टूवार यांच्यासह अनेक विभागाचे प्रमुख व शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Close a set of power stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.