निधीअभावी शाळांचे साडेतीनशे संगणक बंद
By Admin | Updated: October 24, 2016 00:51 IST2016-10-24T00:51:12+5:302016-10-24T00:51:12+5:30
ई-लर्निंग या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांना संगणक वितरीत करून...

निधीअभावी शाळांचे साडेतीनशे संगणक बंद
जिल्हा परिषद शाळांतील स्थिती : पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
चंद्रपूर : ई-लर्निंग या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांना संगणक वितरीत करून तेथील विद्यार्थ्यांना संगणकीय धडे देण्याचे काम प्रशासनस्तरावरून सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ९०० शाळांना संगणक वितरीत करण्यात आले. मात्र संगणक व्यवस्थापनासाठी निधीची तरतुद करण्यात न आल्याने तब्बल ३५० संगणक शाळांमध्ये बंद अवस्थेत पडले आहेत.
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कुठेही मागे राहू नये, यासाठी जिल्हा परिषद शाळांना संगणक पुरविण्याचे काम सुरू आहे. यातून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे दिले जात आहेत. मात्र संगणकात बिघाड झाल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी निधीची तरतुदच करण्यात आलेली नाही. परिणामी जिल्हाभरातील शाळांमध्ये तब्बल ३५० संगणक बंद पडून असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील रोडावलेली विद्यार्थी संख्या दूर करण्यासाठी खासगी शाळांसारख्या सोयीसुविधा देण्याचे काम जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांना सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना ९०० संगणक वाटप करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्रशासनाचे कोट्यवधी रुपयाचे अंदाजपत्रक आहे. यातून लोकपयोगी विविध योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात येते. मात्र अनेक विभागाचा निधी दरवर्षी अखर्चित असते. ज्यासाठी निधीची तरतुद आवश्यक आहे, अशा कामांसाठी निधीची तरतुद होत नसल्याने अनेक शाळांमधील संगणक सध्या धुळखात पडले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
दुरूस्तीचा प्रश्न
वाटप करण्यात आलेले संगणक काही वर्षे सुस्थितीत होते. मात्र, आता यातील अनेक संगणक लहानसहान कारणांमुळे बंद पडले आहेत. संगणकांचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने निधीची तरतुदच केलेली नाही. बिघाड झालेल्या संगणकाची दुरुस्ती तरी कशी करायची, असा प्रश्न शाळांतील मुख्याध्यापकांना पडला आहे.