Clients' financial loot in times of crisis | संकटाच्या काळात ग्राहकांची आर्थिक लूट

संकटाच्या काळात ग्राहकांची आर्थिक लूट

ठळक मुद्देनागरिकांमध्ये संताप : प्रशासनाने प्रतिबंध घालण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे दळणवळण ठप्प झाले. त्यातच दुकानदारांनी जीवनश्यक वस्तूंच्या आणि भाजीपाल्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. संकटाच्या काळात सामान्य नागरिकांना लुटण्याचा हा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
चंद्रपुरात दोन दिवसापूर्वी साखर ३६ रुपये प्रति किलो होती तर खाद्यतेल (सोयाबीन) ९० ते ९५ रुपये प्रती किलो मिळायचे. सद्या साखरेचे भाव ४० ते ४२ रुपये प्रती किलो झाले असून खाद्यतेल (सोयाबीन) ११० ते ११५ रुपये प्रती किलो मिळत आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नागरिक या दोन्ही बाबी पॅकींग केलेल्या वापरत नसल्याने त्यांना या दोन्ही वस्तूंच ‘एमआरपी’ कळायला मार्ग नाही. सोबतच भाजीपाल्याच्या किमतीही वाढल्या आहेत. पूर्वी १० ते ५ रूपये पाव मिळणारा भाजीपाला आता २० ते २५ रुपये पाव विकला जात आहे. शासनाने जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. डिस्ट्रिब्युटर आणि डीलर आपल्याला एमआरपीमध्ये त्या वस्तू देत असल्याने त्याची विक्री नाईलाजास्तव चढ्या भावाने करावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया काही किराणा दुकानदारांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत. कोरोनामुळे शेतीच्या कामाला मजूर मिळत नाही. मिळाल्यास त्यांना अधिक मजूरी द्यावी लागते. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले. आम्ही नाईलाज म्हणून दर वाढविला असल्याचे काही भाजीपाला उत्पादकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र, जिल्ह्यातील नागरिक संकटात सापडले आहेत. अशा कठीण काळात नफेखोरीला महत्व न देता सामान्य नागरिकांची ही आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

एसी, कूलर वापराला लागलेत ‘ब्रेक’
चंद्रपूर : राज्यात कोरोनाने काहूर माजविले. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एसी व कूलरचा वापर करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे. त्यामुळे ही उपकरणे अडगळीतच पडली आहेत. लॉकडाऊनमुळे खरेदीलाही ब्रेक लागले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात साधारणत: महाशिवरात्रीनंतर वातावरणात बदल होतो. चंद्रपुरात तर धूळवडीनंतर उन्हाचे चटके जाणवायला लागतात. मात्र, मध्यंतरीच्या काळात काही भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पारा वाढला नाही. कोरोना विषाणूचा राज्यातही मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी म्हणून कूलर, एसीचा वापर टाळण्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आवाहन केले आहे. यामुळेच मार्चमध्येच घरोघरी लागणारे कुलर अद्याप अडगळीत आहेत. एसीही भिंतीची केवळ शोभा वाढवताना दिसत आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याला टीव्ही, रेफ्रिजरेटर, एसी, कूलर, आदींसह वाहनांची मोठी खरेदी होते. यातून बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र यावेळी गुढीपाडव्यावरही कोरोनाचे सावट असल्याने ही उलाढाल होऊ शकली नाही. त्यामुळे इलेक्ट्रानिक साधने व्यवसायालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Web Title: Clients' financial loot in times of crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.