महाकाली यात्रेसाठी झरपट नदीची स्वच्छता
By Admin | Updated: March 18, 2017 00:38 IST2017-03-18T00:38:40+5:302017-03-18T00:38:40+5:30
महाकाली देवी यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभुमीवर गुरूवारी सकाळी ८ वाजता चंद्रपूर शहर ...

महाकाली यात्रेसाठी झरपट नदीची स्वच्छता
मनपाचा पुढाकार : सामाजिक संस्था व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग
चंद्रपूर : महाकाली देवी यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभुमीवर गुरूवारी सकाळी ८ वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिका, सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ सेवा प्रतिष्ठान व सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरच्या व ग्रिन थिकर व एन.एस.एसच्या वतीने गुरूमाऊली मागील झरपट पात्रात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता करण्यात आली.
मनपा आयुक्त संजय काकडे, स्थाई समिती सभापती संतोष लहामगे, ज्येष्ठ पत्रकार मुरली मनोहर व्यास, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले, सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड, प्रभारी प्रभाग अधिकारी नरेंद्र बोबाटे, स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार, प्रा. कुलदीप , कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. उषा खंडाळे, डॉ. प्रा. शरयु पोतनुरवार, प्रा. डॉ. कविता रायपुरकर, प्रा. प्रियंका पाटील, हनमंतु डंभारे, आशिष व्यास व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानास सुरूवात झाली.
झरपट नदी पात्रात पसरलेली इकोर्निया वनस्पती काढून पात्र स्वच्छ करण्यात आले. काढण्यात आलेली इकोर्निया वनस्पती वेळीच उचलण्यात आले. या मोहिमेत मनपाचे ७० सफाई कामगार व महाविद्यालयाचे १५० विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ सेवा प्रतिष्ठानने या कामात पुढाकार घेत सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)
यात्रेसाठी पार पडली आढावा सभा
यात्रेची पुर्वतयारी करण्यासाठी शुक्रवारी महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मनपा आयुक्त संजय काकडे व उपायुक्त विजय देवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा पार पडली. या सभेत यात्रेत येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विशेष सुचना देण्यात आले. यावर्षी भाविकांसाठी यात्रेत अॅक्वागार्ड लावण्यात येणार असून थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था, निवास व्यवस्था, आंघोळीसाठी शावर व विद्युत व्यवस्था तसेच वादळ व पाऊस आल्यास पर्यायी व्यवस्था या विषयावर सभेत चर्चा करण्यात आली.