श्रमदानातून इरई नदीची स्वच्छता
By Admin | Updated: March 23, 2015 01:11 IST2015-03-23T01:10:32+5:302015-03-23T01:11:13+5:30
दाताळा मार्गावरील इरई नदी पुलावरुन सतत पूजाअर्चेचे सामान फेकल्यामुळे नदीच्या पात्रात घाण पसरली आहे.

श्रमदानातून इरई नदीची स्वच्छता
चंद्रपूर : दाताळा मार्गावरील इरई नदी पुलावरुन सतत पूजाअर्चेचे सामान फेकल्यामुळे नदीच्या पात्रात घाण पसरली आहे. या घाणीमुळे अडकलेल्या प्लास्टिक, वनस्पतींचा तयार झालेला दोन-तीन फुटांचा घाणीचा थर रविवारी जागतिक जल दिनानिमित्त स्वच्छ करण्यात आला. प्रहार संघटनेने जागतिक जलदिनाचे औचित्य साधून हे अनोखे आंदोलन केले.
शहरातील विविध संघटना व नागरिकांनी एकत्र येऊन फावडे घेवून नदी पात्रात उतरले. पाय ठेवायला जागा नसलेल्या ठिकाणी पाच तासानंतर नदीचे स्वच्छ पाणी दिसायला लागले. त्यानंतर पुलावर ‘इरई आमची आई, आता घाण करायची नाही’ जागतिक जल दिनांच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश लिहून श्रमदानाची सांगता करण्यात आली.
इरई नदीला लागून असलेल्या वसाहतीमधील पूर पीडितांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेने जागतिक जलदिनाचे औचित्य साधून आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात प्रहार सोबत वृक्षाई, मुस्लीम हक्क संघर्ष समिती, गाज-ए-हिंद, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, मनोवेध व परिसरातील अनेक जागृत नागरिकांनी सहभाग घेतला.
जिल्हा प्रशासनातर्फे साडेअकरा कोटी खर्च करुन इरई नदीचे खोलीकरण करण्यात येणार आहे. हे खोलीकरण व्यावहारिक तत्त्वावर कंत्राट देऊन करण्याऐवजी लोकसहभागातून करावे, त्यासाठी शहर व जिल्ह्यातील कंत्राटदार, ट्रान्स्पोर्टर्स, उद्योजक व सामान्य नागरिकांचा सहभाग घ्यावा, पूरपीडितांना मनपाने दिलेले नोटीस परत घ्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पप्पु देशमुख, कुशब कायरकर, हाजी अनवर अली, सादीक कुरेशी, दिलीप घोरे, प्रशांत आर्वे, फिरोज खान पठाण, घनश्याम येरगुडे आदी सहभागी होते.