स्वच्छ चंद्रपूरसाठी सर्वांचा हातभार महत्त्वाचा

By Admin | Updated: February 23, 2017 00:37 IST2017-02-23T00:37:04+5:302017-02-23T00:37:04+5:30

देशाची संपूर्ण स्वच्छतेकडे वाटचाल सुरू आहे. स्वच्छतेच्या या अभियानात जिल्हाही मागे राहता कामा नये.

Cleanliness is important for everyone | स्वच्छ चंद्रपूरसाठी सर्वांचा हातभार महत्त्वाचा

स्वच्छ चंद्रपूरसाठी सर्वांचा हातभार महत्त्वाचा

सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूरकरांना नि:शुल्क डस्टबीन
चंद्रपूर : देशाची संपूर्ण स्वच्छतेकडे वाटचाल सुरू आहे. स्वच्छतेच्या या अभियानात जिल्हाही मागे राहता कामा नये. जिल्ह्यासह चंद्रपूर शहर सर्वाधिक स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर शहर स्वच्छ अभियानांतर्गत महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना डस्टबीनचे वाटप करण्यात येत आहे. आज काही नागरिकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिकेच्या गांधी चौकाजवळील मैदानात डस्टबीन वाटपाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पालकमंत्र्यांसह आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, आयुक्त संजय काकडे, मनपा सभापती एस्तेर शिरवार आदी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हयाने शंभर टक्के शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. शहरी व ग्रामीण भागात शौचालयाची मोहिम राबविण्यात येत आहे. शौचालयासोबतच इतर स्वच्छताही महत्वाची आहे. महानगरपालिकेने त्यासाठी चांगला पुढाकार घेतला असून शहरवासियांचे यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
दरदिवशी निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक कुटूंबास डस्टबीन वितरीत केली जात आहे. या डस्टबीनमधील कचरा महानगरपालिकेच्या वतीने जमा केला जाईल. ८२ हजार २० मालमत्ताधारकांना सदर डस्टबीनचे वितरण केले जाणार आहे. यासाठी मनपा निधी अंतर्गत ७२ लाख ५८ हजार रुपये खर्च करण्यात येत आहे. प्रत्येक मालमत्ता धारकास हिरवी व निळी अशा दोन डस्टबीन दिल्या जाणार असून एकात ओला तर एका डस्टबीनमध्ये सुका कचरा टाकला जाणार आहे.
शहरात शौचालयाचा कार्यक्रमही मनपाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर राबविला जात असून सहा हजार ६९२ इतके वैयक्तीक शौचालयाचे मनपाचे उद्दिष्ठ आहे. तर पाच हजार १५० शौचालये बांधकाम पूर्ण झाले. तर एक हजार ५४२ बांधकाम प्रगतीपथावर आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त संजय काकडे यांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभ्यासिकेचे लोकार्पण
महानगरपालिकेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या भानापेठ वार्ड येथील अभ्यासिकेचे लोकार्पणही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. ३९ लाख ४५ हजार रुपये खर्च करून ही अभ्यासिका बांधण्यात आली आहे. होतकरू विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएससी तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ही अभ्यासिका फार उपयोगी ठरेल, असे ना. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर राखी कंचलार्वार यांनी केले. यावेळी पालमंत्र्यांची पुस्तक तुला करण्यात आली.

Web Title: Cleanliness is important for everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.