अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांची कोंडी
चंद्रपूर : जिल्ह्यात सिंचन विहीर योजनेची काही कामे झाली आहेत. खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांला तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, मंजूर झालेल्या विहिरींचे खोदकाम करूनही अनुदान मिळत नसल्याने अनेकांच्या विहिरींचे बांधकाम रखडले आहे.
सांडपाण्यामुळे आरोग्य बाधित
राजुरा : तालुक्यातील अनेक गावांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. त्यातून डासांची पैदास वाढली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई करावी, सांडपाणी वाहून नेणारा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रवाशी निवाऱ्याची दुरूस्ती करा
गोंडपिपरी : तालुक्यातील बहुतांश गावातील प्रवाशी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
राजुरा : शहरातील डुकरे व मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले.
रानडुकरांचा हैदोसाने नागरिक त्रस्त
कोरपना : कोरपना व परिसरातील शिवारात मोठ्या प्रमाणात रानडुकरांनी हैदोस घातला असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जंगलातील रानडुकरे शेतात येत असल्याने शेतात असलेल्या उभ्या पिकांची नासाडी होत आहे. रानडुकरांच्या उपद्रवामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रानडुकरे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग व अन्य रस्त्यांवरही फिरकत असल्याने दुचाकी वाहनधारकांत भीतीचे सावट आहे.