स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा
By Admin | Updated: April 24, 2015 00:58 IST2015-04-24T00:58:23+5:302015-04-24T00:58:23+5:30
देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेचा मंत्र पुकारत स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा संकल्प केला. या अंतर्गत शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे,

स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा
भेजगाव: देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेचा मंत्र पुकारत स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा संकल्प केला. या अंतर्गत शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे, याचे विविध योजनेतून प्रबोधनातून बाळकडू पाजले. तसे निर्देशही दिले. पण येथील समाजमन स्वच्छतेविषयी जागृत नाही. म्हणून प्रशासनाने राबविलेला स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे चित्र भेजगाव परिसरात पहावयास मिळत आहे.
भेजगावात तीन- चार वर्षापूर्वी एकदाच ग्रामस्वच्ता अभियान राबविण्यात आले. तेव्हा गावाचा चेहरा मोहरा बदलला. त्यावेळी गावात तरुणाईची शक्ती पाहायला मिळाली. त्यांच्यातील एकोप्यामुळेच मूल तालुक्यातून भेजगावला स्वच्छतेबाबत प्रथम येण्याचा मानही मिळाला. पुरस्काराच्या याच रकमेतून व लोकवर्गणीतून सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्याचे ठरले व त्यानुसार शौचालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र या शौचालयाला पुढे उदासीनतेची दृष्ट लागली. आता हे शौचालय बेवारस पडून आहे.
ग्रामस्थांना शौचालयाचे महत्व पटवून द्यायचे, स्वच्छतेचा दिंडोरा पिटायचा आणि आपणच त्यासाठी काहीच करायचे नाही, असे समिकरण येथील पदाधिकाऱ्यांनी अवलंबल्यजाचे दिसून येते. लाखो रुपये खर्चून अर्धवट बांधलेले शौचालय ग्रामस्थांना उपयोगात येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
संपूर्ण गाव दुर्गंधीने व अस्वच्छतेने बरबटलेले असतानाच उघड्यावरील प्रात: र्विधीमुळे तर मोठे संकट निर्माण झाले आहे. गावागावात भेजगावसारखेच चित्र निर्माण झाल्याने शेवटी स्वच्छतेसाठी लोक चळवळ उभारणे सरकारला क्रमप्राप्त झाले. या चळवळीत अनेक गावे सहभागी झाली. मात्र या चळवळीला कुशल व धोरणी नेतृत्वाचा अभाव असल्याने आज घडीला स्वच्छता अभियान नावापुरतेच मर्यादित राहिले आहे. स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हे येथील समाजमन मानायला तयार नाही. घरातील कचरा रस्त्यावर फेकण्याची सवय अजूनही नागरिकांची गेली नाही. म्हणून कचरा वाढत आहे. गावेच्या गावे कचरामय होताना दिसत आहेत.
स्वच्छ भारत मिशनमुळे स्वच्छतेची जाणीव प्रत्येकाला व्हायला पाहिजे होती. मात्र ती अद्यापही झालेली नाही. यामुळे आजघडीला स्वच्छता टिकवून ठेवणे लोकांना जमले नाही. परिणामी या योजनेचा फज्जा उडाल्याची चित्र परिसरात दिसून येत आहे. (वार्ताहर)