स्मार्ट बल्लारपूरसाठी धडपड
By Admin | Updated: December 2, 2015 00:49 IST2015-12-02T00:49:46+5:302015-12-02T00:49:46+5:30
स्वच्छ भारत- स्वच्छ महाराष्ट्र याप्रमाणेच स्वच्छ व सुंदर बल्लारपूर हे नगर परिषद प्रशासनाचे स्वप्न आणि ध्येय आहे.

स्मार्ट बल्लारपूरसाठी धडपड
जनसंपर्कातून नगर पालिकेची जागृती : नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई
बल्लारपूर: स्वच्छ भारत- स्वच्छ महाराष्ट्र याप्रमाणेच स्वच्छ व सुंदर बल्लारपूर हे नगर परिषद प्रशासनाचे स्वप्न आणि ध्येय आहे. हे ध्येय गाठण्याकरिता स्वच्छतेबाबत सर्वांनी काळजी घेऊन इतरांनाही स्वच्छतेविषयी प्रवृत्त करावे, असे आवाहन बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी येथील जनतेला केले. स्वच्छता अभियानाअंतर्गत जनजागृती करिता न.प. सभागृहात एक सभा शुक्रवारी पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा छाया मडावी होत्या. चंदनसिंह चंदेल, नगरसेविका रेणूका दुधे, सिक्की यादव, विक्की दुपारे, कांता ढोके, महिला व बाल कल्याण सभापती वंदना तामगाडगे, कार्यालय अधीक्षक विजय जांभुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सभेत महिला संघटना, सामाजिक-सेवाभावी आणि शैक्षणिक संस्था, शिक्षक तसेच उद्योग प्रतिनिधींची उपस्थिती होती. या सर्वांना स्वच्छतेचे महत्व आणि त्याबाबत नगरपरिषदेकडून सुरु असलेले युद्धस्तरावरील कार्य आणि विशेष उपक्रम यांची माहिती देऊन या उपक्रमात सक्रिय भाग घेण्याची स्वच्छतेबाबत जागरुक राहण्याची विनंती न.प.कडून करण्यात आली. कचरा, निर्मूलन राष्ट्रीय कार्य असल्याचे यात आवर्जून सांगण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे आणि घंटागाडीत सुका व ओला कचरा वेगवेगळ्या पेटीत कसा टाकावा, जेणेकरुन संकलित झालेला कचरा निस्तारण्यासाठी सोयीचे जाईल याबाबत चित्रफितीद्वारा समजावून सांगितले.
सुका व ओला कचरा वेगवेगळा कसा करायचा यावर त्यांनी मार्गदर्शन केले. आता हे सक्तीचे राहणार असून तसे न करणाऱ्यांवर दंडही ठोठावला जाईल, असे स्पष्टपणे मुख्याधिकारी यांनी सांगितले. उपस्थितांमधून काहींनी स्वच्छतेबाबत सूचना मांडल्या. नगराध्यक्षा मडावी, चंदनसिंह चंदेल, वसंत खेडेकर, रेणुका दुधे यांची ही भाषणे झालीत. संचालन व आभार प्रदर्शन विजय जांभुळकर यांनी केले. या सभेत महिलांची संख्या लक्षणीय होती. (तालुका प्रतिनिधी)