बाजार जागा मोजणीदरम्यान वाद

By Admin | Updated: April 9, 2016 01:27 IST2016-04-09T01:27:25+5:302016-04-09T01:27:25+5:30

वादग्रस्त आठवडी बाजाराच्या जागेची मोजणी गुरुवारी भूमी अभिलेख कार्यालयाद्वारा करण्यात आली.

Claims during market place count | बाजार जागा मोजणीदरम्यान वाद

बाजार जागा मोजणीदरम्यान वाद

असभ्य वर्तणूक : सरपंचांचे पती व सासऱ्यांकडून कामात अडथळा
चंदनखेडा : वादग्रस्त आठवडी बाजाराच्या जागेची मोजणी गुरुवारी भूमी अभिलेख कार्यालयाद्वारा करण्यात आली. यात बाजाराच्या हद्दीत इतरासोबतच विद्यमान सरपंचांचे अतिक्रमण आल्याने सरपंचांचे पती व सासऱ्यांनी पदाधिकारी, पत्रकार, मोजणी अधिकारी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, बिट अंमलदार यांच्यासोबत शाब्दीक बाचाबाची करून वाद निर्माण केला. संसद आदर्श ग्रामात विद्यमान सरपंचांच्याच कुटुंबीयांकडून असा असभ्य प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सर्वे नं. ३८ या ०.५६ आर. असलेल्या आठवडी बाजाराच्या जागेत अतिक्रमण झाल्यामुळे बाजार जागेचे क्षेत्र कमी झाले व त्यामुळे बाजार हा क्षेत्राच्या बाहेर रस्त्याच्या कडेने दुरवर पसरत गेला. परंतु अतिक्रमण हटविण्यापूर्वीच महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत आठवडी बाजार ओटे बांधकाम मंजूर झाले. जागेची मोजणी केल्यानंतरच ओटे बांधकाम करण्यात यावे, असे बाजार विकास समिती तथा विरोधी गटातील सदस्यांनी सुचविले असता त्यास डावलून मुजोरीने काम सुरू केले. परंतु लगतच्या सर्वे नं. ३८/१ च्या धकाते यांनी शासकीय मोजणी केली असता बांधकाम केलेले ओटे धकाते यांच्या हद्दीत आले व त्यांनी सिमेंटपोल रोवून कंपाउंड केले. यानंतर हा वाद चिघळतच गेला. शेवटी दबावगटामुळे ग्रामपंचायतीने सारवासारव करीत नाईलाजास्तव मोजणीसाठी अर्ज सादर केला. १५ मार्चच्या ग्रामसभेत शासकीय मोजणीत बाजाराच्या जागेच्या हद्दीत आलेले अतिक्रमण काढून बाजाराची जागा मोकळी करण्यात यावी, असे सर्वानुमते ठरविले. त्यानुसार गुरुवारी भूमी अभिलेख उपअधिक्षक डी.जी. थोरात यांच्या मार्गदर्शनात संतोष जुनघरे या मोजणी कर्मचाऱ्यांनी मोजणीस सुरूवात केली असता सरपंचांच्या सासऱ्यानी पत्रकार सदानंद आगबत्तनवार तथा ग्रामविकास समिती अध्यक्ष प्रशांत कोहळे यास शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. यात पत्रकार तथा ग्रामविकास समिती अध्यक्षांनी संयम बाळगून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोजणीत धकाते यांनी यापूर्वी मोजणीनंतर रोवलेले सिमेंट खांब हे योग्य ठिकाणी असल्याचे निदर्शनास येताच सरपंचांचे पती व सासऱ्याकडून वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला गेला व यात मोजणी थांबविण्यात आली.
अखेर तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बंडू निखाते, उपसरपंच विठ्ठल हनवते, ग्रा.पं. सदस्य, बाजार विकास समिती सदस्य, ग्रामविकास अधिकारी व नागरिकांनी बाजाराच्या जागेची हद्द निश्चित करण्याबाबत मोजणी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानुसार पुन्हा बाजारस्थळी जावून मोजणीस प्रारंभ करण्यात आला. यात सरपंचांच्या कुटुंबीयांचेच अतिक्रमण दिसून आले. यामुळे संतापून मोजणी सरपंचांचे पती व सासऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. (वार्ताहर)

Web Title: Claims during market place count

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.