वसतीगृहातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
By Admin | Updated: November 29, 2014 23:19 IST2014-11-29T23:19:31+5:302014-11-29T23:19:31+5:30
रत्नापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरातील भारत वस्तीगृहाचे शौचालय, बाथरूम व मुत्रीघराच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्या जात नसल्याने परिसरातील नागरिकांना

वसतीगृहातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
नवरगाव : रत्नापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरातील भारत वस्तीगृहाचे शौचालय, बाथरूम व मुत्रीघराच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्या जात नसल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वसतीगृह प्रशासनाने व्यवस्थापन करण्याची मागणी रत्नापूर ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व नागरिकांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
भारत वसतीगृहातील आंघोळीचे पाणी, मलमुत्र, शिळे अन्न व भांडे धुतलेले घाणेरडे पाणी अंगणवाडी क्रमांक चारजवळील नालीमध्ये सोडले जाते. त्यामुळे नालीमध्ये दुर्गंधी पसरली असून डुकरांचा व कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. याच परिसरात लोकवस्ती असून नागरिकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याने काही नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. सदर तक्रारीची दखल घेऊन रत्नापूर ग्रामपंचायतीने संबंधित वसतीगृह प्रशासनाला लेखीपत्र देऊन सांडपाण्याची सोय करण्याची सुचना केली. परंतु वसतीगृह प्रशासनाने कोणतीही सुधारणा केली नाही. मागील तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांच्या तसेच शेजारील अंगणवाडी मुलांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे.
संबंधित सांडपाण्याची व्यवस्था वसतीगृह प्रशासनाने करावी, अशी मागणी सरपंच निलिमा गभणे यांनी केली. यावेळी ग्रा.पं. सदस्य विनोद निनावे, उद्धव तोंडफोडे, मोरेश्वर पर्वते व परिसरातील नागरिक उपस्थित होते. या संबंधीचे तक्रार समाजकल्याण अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पं.स. सिंदेवाही, संवर्ग विकास अधिकारी यांना दिली आहे. (वार्ताहर)