चार वर्षांत मूल शहराचा होणार कायापलट !

By Admin | Updated: August 30, 2015 00:37 IST2015-08-30T00:37:39+5:302015-08-30T00:37:39+5:30

मूल शहराचा विकास करण्यासाठी ही परिषद असून या विकासाचे आपण वाटेकरी व्हावे, हा या मागचा उद्देश आहे.

The city will be transformed into four years | चार वर्षांत मूल शहराचा होणार कायापलट !

चार वर्षांत मूल शहराचा होणार कायापलट !

सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा : मूल शहर विकास परिषदेत नागरिकांनीही मांडल्या सूचना
मूल : मूल शहराचा विकास करण्यासाठी ही परिषद असून या विकासाचे आपण वाटेकरी व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. लोकसहभाग व लोकनियंत्रण यातून येत्या चार वर्षात मूल शहराचा विकासात्मक कायापालट केला जाईल, असे आश्वासन अर्थ, नियोजन व वनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
त्यांच्या पुढाकाराने २८ आॅगस्ट २०१५ रोजी मूल येथील भाग्यरेखा सभागृहात उच्चधिकाऱ्यांसह मूल शहर विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, नगराध्यक्षा रिना थेरकर, अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता एम. जे. शेख, वीज विभागाच्या अर्चना घोडेस्वार, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, तहसीलदार राजेश सरवादे, न.प. मुख्याधिकारी व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
ही परिषद मूल शहराच्या विकासाची असून ग्रामीण भागासाठी स्वतंत्र विकास परिषद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मूल बायपाससाठी चार कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून बायपासचे काम वेगाने होईल. रेल्वे गेट ते नाका या सीमेंट रस्त्यासाठी १५ कोटी मंजूर केले आहेत. शहरातील वौशिष्टपूर्ण कामांसाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असे सांगून आजपर्यंत ८५ कोटी रुपये मूल शहर विकासाठी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. बायपास निधीसह ९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मूल शहराला २४ तास पाणी मिळावे म्हणून नगरोत्थानमध्ये ४० कोटी रुपयांच्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर, मूल व बल्लारपूर येथील बसस्थानक अत्याधुनिक करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
मूल, पोंभूर्णा व जीवती तालुक्याचा टाटा ट्रस्टच्या सहकायार्ने सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. आराखड्यात ज्या बाबी घेण्यात येतील, त्याची पुस्तिका एक ते दीड महिन्यात नागरिकांना देण्यात येणार असून नागरिकांना या पुस्तिकेच्या आधारे नियंत्रण ठेवणे सोईचे होणार आहे. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी लोकांच्या समित्या गठीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मूल शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मूल शहर विकास आराखडा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. विकास परिषदेची भूमिका नगराध्यक्षा रिना थेरकर यांनी आपल्या भाषणात मांडली. या परिषदेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी उपयुक्त अशा सूचना मांडल्या. (तालुका प्रतिनिधी)
या कामांचा घेतला आढावा
मूल शहरासाठी मंजूर १० कोटी रु. किमतीच्या सिमेंट रस्त्याच्या काम, मा.सा. कन्नमवार यांच्या स्मारक व सभागृह काम, बायपास रस्त्याची सद्यस्थिती, नॅशनल हायवेची सद्यस्थिती, शहरात मंजूर प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, तलाव सौंदर्यीकरण, बाजारपेठ, जलतरण तलाव, नगर परिषद इमारत, नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या वनविभागाच्या जागेवरील दुकानाची सद्यस्थिती, स्मशानभूमी विकास नियोजन, ओपन स्पेसवर झाडे लावण्याचा कार्यक्रम, शहरातील पाणी पुरवठा योजनेचा आढावा, बसस्थानक नुतनीकरणाचे काम, तालुका क्रीडा संकुल बांधकाम, उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा, शहरासाठी मंजूर १५.६१ कोटी रु.निधितून बांधण्यात येणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे काम, केंद्रीय मार्ग निधीतून मंजूर मूल शहरातील १५ कोटी रु.किमतीच्या राज्य महामार्गाचे काम, जुलै २०१५ च्या अर्थसंकल्पात मंजूर २० कोटी रु.विकास निधीचे नियोजन, शहरातील सार्वजनिक शौचालये व्यवस्थेबाबत चर्चा, पंचायत समिती इमारतीचा आढावा, सोमनाथकडे जाणाऱ्या एक कोटी रु.किंमतीच्या रस्त्याच्या बांधकामाचा आढावा, शहरातील चौक सौंदर्यीकरण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे काम, शहरातील विद्युत व्यवस्थेची सद्यस्थिती, शहरात बांधण्यात येत असलेल्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारत बांधकाम व शहरातील सर्व सार्वजनिक विहिरींचे नूतनीकरण करण्याची योजना इत्यादी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

Web Title: The city will be transformed into four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.