सिटी स्कॅन, एमआरआय चालकांच्या बंदमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ

By Admin | Updated: June 21, 2016 00:41 IST2016-06-21T00:41:19+5:302016-06-21T00:41:19+5:30

पुणे येथे एका रेडिओलॉजिस्टवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदचा फटका संपाच्या ..

City Scans, Games With Patients With The Stop Of MRI Drivers | सिटी स्कॅन, एमआरआय चालकांच्या बंदमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ

सिटी स्कॅन, एमआरआय चालकांच्या बंदमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ

बेमुदत संप: चंद्रपुरात एक्स रे आणि सोनोग्राफी सेंटरही बंद
चंद्रपूर : पुणे येथे एका रेडिओलॉजिस्टवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदचा फटका संपाच्या पहिल्याच दिवशी गंभीर रूग्णांना बसला. इंडियन रेडिआॅलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनने संघटनात्मकदृष्ट्या हे बंदचे पाऊल उचलले असले तरी अत्यावश्यक सेवाच ठप्प झाल्या. अनेक गंभीर रूग्णांची तपासणीच न झाल्याने या बंदमुळे रूग्णांच्या जीवाशी खेळ झाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
चंद्रपुरातील इंडियन रेडिआॅलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनच्या शाखेच्या आवाहनानुसार सोमवारपासून चंद्रपुरातील सीटी स्कॅन मशिन, एमआरआय, सोनोग्राफी आणि एक्स रे मशिन्स बंद ठेवण्यात आल्या. शहरात सुमारे पाच सीटी स्कॅन मशिन, तीन एमआरआय, असोसिएशनच्या सदस्यांकडे असलेल्या १३ आणि खाजगी डॉक्टरांकडे असलेल्या ६० ते ७० एक्स रे मशिन्स आणि सुमारे ४० सोनोग्राफी मशिन्स आहेत. त्या बंद असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
पुणे येथे तेथील महानगर पालिकेच्या वैद्यकीय पथकाने १२ जूनला केलेल्या कारवाईत एका केंद्रावरील मशिन जप्त केली होती. ही कारवाई रात्री ९ ते पहाटे दोन वाजपर्यंत चालली होती. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देवून आपला संताप इंडियन रेडिआॅलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनने व्यक्त केला होता. चाचणी करताना विसाव्या क्रमांकाच्या रकान्यात भरावयाच्या माहितीमध्ये चुकी झाली. यात केंद्रचालकाला दोषी ठरवून कारवाई करण्याची प्रकिया अवलंबल्याने हा संताप होता, दरम्यान, १३ जूनला पुण्यातील डॉक्टरांनी बंद पाळला. त्यानंतर १४ जूनला राज्यातील डॉक्टरांनी बंद पाळून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सरकाने लक्ष: न दिल्याने २० जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, मागील दोन ते तीन वर्षात सुमारे ५४० मशिन सिल करण्यात आल्या आहेत. त्यातील ९९ टक्के कारवाया निव्वळ कारकुनी चुकांमुळे झाल्या आहेत. ही बाब सरकारच्या आणि आरोग्य विभागाच्या लक्षात आणूनही कसलीही दखल घेतली गेली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, संघटनेचे पदाधिकारी मंगळवारी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना होत आहेत. सरकारने यावर तोडगा काढावा आणि जनतेला बंदमुळे होणारा त्रास दूर करावा, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

सर्वसामान्यांच्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. मात्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष न दिल्याने हे आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे. आम्ही दूरवरून आलेल्या ग्रामीण रूग्णांना तात्काळ सेवा देतो, निकड आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून कागदपत्रांसाठी परत पाठविणे योग्य वाटत नाही. आंदोलनकाळात रूग्णांनी सरकारी सेवांचा आधार घ्यावा, केवळ क्लिष्ट कायदे दूर करावे, ही मागणी आहे.
- डॉ. नवल राठी, सचिव, इंडियन रेडिआॅलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन जिल्हा शाखा

Web Title: City Scans, Games With Patients With The Stop Of MRI Drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.