नगराध्यक्षांनी द्वेषभावनेतून अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: September 8, 2016 00:44 IST2016-09-08T00:44:11+5:302016-09-08T00:44:11+5:30
माझ्या हातात सत्ता आहे; मी आपले संपूर्ण घर पाडू शकतो, अशी धमकीवजा भाषा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी वापरली.

नगराध्यक्षांनी द्वेषभावनेतून अतिक्रमण हटविले
पत्रकार परिषद : भद्रावतीच्या सरस्वती मोहितकर यांचा आरोप
भद्रावती : माझ्या हातात सत्ता आहे; मी आपले संपूर्ण घर पाडू शकतो, अशी धमकीवजा भाषा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी वापरली. त्यांनी द्वेषभावनेतून अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावावर घराची नासधूस केल्याचा आरोप झाडे प्लॉट घुटकाळा येथील रहिवासी सरस्वती मोहितकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
माहिती देताना सरस्वती मोहितकर म्हणाल्या, ६ सप्टेंबर रोजी नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाद्वारे अतिक्रमण काढत असताना माझ्या घरासह इतरांच्या घरांचे बरेच नुकसान झाले. परंतु, अतिक्रमण हटाव मोहीम ही भेदभावपूर्णरितीने राबविण्यात आली, असे सांगितले.
नगर पालिका क्षेत्रातील झाडे प्लॉट घुटकाळा या भागातील बहुतेक लेआऊट हे नगर रचनाकार कार्यालयाकडून मान्यता प्राप्त नसल्याने शेतमालकाने पाडलेल्या प्लॉटनुसार घरांचे बांधकाम झाले आहे. त्यामुळे कुणी अतिक्रमण केले, असे म्हणणे चुकीचे आहे. नगर परिषदेने आधी या भागाची मोजणी करून नंतरच अतिक्रमण हटाव मोहिमेची कारवाई करायला हवी, असे सरस्वती मोहीतकर यांनी यावेळी सांगितले.
अतिक्रमण हटविताना नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना विचारणा केली असता, त्यांनी तुमचे पूर्ण मकान पाडू शकतो; माझ्या हातात सत्ता आहे, अशी त्यांनी भाषा वापरली. लोकसभा निवडणुकीच्या काळात विशिष्ट उमेदवाराचा प्रचार करण्याकरिता पती दिनकर मोहीतकर यांच्यावर दबाव आणला. परंतु, त्यानंतरही प्रचार केला. त्याच काळात अनिल धानोरकर यांनी माझ्याशी विरोध करणे महागात पडेल, असा दम दिला होता, असे सरस्वती मोहितकर यांनी सांगितले. त्यामुळे अतिक्रमण हटविताना भेदभावपूर्ण कारवाई केली. माझ्यासोबत कांताबाई कत्तूरवार, गजानन धांडे यांच्या घरांचेही नुकसान झाले असून या संदर्भात पोलीसात नगराध्यक्ष आणि उपअभियंता यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. न्यायालयातही दाद मागणार असल्याचे सरस्वती मोहीतकर यांनी सांगितले. यावेळी दिनकर मोहीतकर, कांताबाई कत्तूरवार, राकेश कत्तूरवार, विनोद कोळसे, राजू घुगुल, संतोष घुगुल उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
मोहीतकर हे प्लाटधारक नसून ते पाच वर्षापूर्वी ते येथे राहण्यास आले आहे. त्यांनी घर बांधलेल्या जागेतून यापूर्वीच पालिकेची नळ पाईपलाईन आहे. मकान अतिक्रमणात येत असलेल्या चार घरांचे बांधकाम अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पाडण्यात आले व वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यांची कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे मोहीतकर यांनी आपणावर केलेले आरोप बिनबुडाचे आहे.
- अनिल धानोरकर,
नगराध्यक्ष, भद्रावती