महापौरांकडून शहर स्वच्छतेचा आढावा
By Admin | Updated: May 17, 2017 00:42 IST2017-05-17T00:42:15+5:302017-05-17T00:42:15+5:30
महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर यांनी शहर स्वच्छतेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

महापौरांकडून शहर स्वच्छतेचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर यांनी शहर स्वच्छतेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
या संदर्भात आयोजित सभेला उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, गटनेते वसंत देशमुख, अनिल रामटेके, नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख, सुरेश पचारे आदी उपस्थित होते. महापौर यांनी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता शहरातील कोणकोणत्या मुख्य नाल्याची सफाई करण्यात आली, याची संपूर्ण माहिती तीनही झोन अधिकाऱ्यांना व स्वच्छता निरीक्षकांना मागितली. त्यानंतर अजूनही कोणत्या नाल्याची सफाई झालेली नाही व का झालेली नाही, याबाबत संबंधित स्वच्छता निरीक्षकांना जाब विचारण्यात आला. ज्या नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही, त्याची सफाई तात्काळ करण्याचे निर्देश महापौर यांनी दिले. सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस जवळ असल्याने शहरातील सर्व नाल्याची सफाई करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहरातील मुख्य नाले व लहान नाल्यांची सफाई करण्याचे निर्देश दिले. तसेच शहर स्वच्छतेसाठी व्हॅक्युम क्लीनर मशिन घेण्याचे निर्देश महापौर यांनी अधिकाऱ्यांना दिले. अनेक नागरिक रस्त्यावर गिट्टी, रेती, विटा व इतर बांधकाम साहित्य ठेवतात. अशा नागरिकांवर दंड आकारण्यात यावे, असे निर्देश घोटेकर यांनी दिले. या सभेत सदस्यांनी आपापल्या प्रभागातील स्वच्छतेबाबत अडचणी सांगितल्या. नाल्या सफाई करताना काही भागात नाल्यात अतिक्रमण करण्यात आले असल्याने सफाई करताना कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती सदस्यांनी दिली. तसेच मनुष्यबळ कमी असल्याने सफाईच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याचे या सभेत सदस्यांनी सांगितले. सभापती यांनी आवश्यक त्या ठिकाणी जेसीबी मशिन लावून सफाई करावी, अशी सूचना यावेळी मांडली.