नगर स्वच्छता व देखाव्यांनी महोत्सवाची दमदार सुरुवात
By Admin | Updated: January 3, 2016 01:23 IST2016-01-03T01:23:45+5:302016-01-03T01:23:45+5:30
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कल्पनेतून ‘ब्रह्मपुरी महोत्सव २०१६’ चे आयोजन होत आहे.

नगर स्वच्छता व देखाव्यांनी महोत्सवाची दमदार सुरुवात
ब्रम्हपुरी महोत्सव : संपूर्ण शहरातच आनंदाचे वातावरण
ब्रह्मपुरी : आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कल्पनेतून ‘ब्रह्मपुरी महोत्सव २०१६’ चे आयोजन होत आहे. या महोत्सवाची नगर स्वच्छतेने व आकर्षक देखावे काढून शनिवारी दमदार सुरुवात करण्यात आली. या महोत्सवामुळे ब्रह्मपुरीत आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.
महोत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता ख्रिस्तानंद चौकातून शहराच्या मुख्य मार्गाची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात लोकप्रतिनिधी, समाजसेवक, अधिकारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नेवजाबाई हितकारिणी स्कूल, ख्रिस्तानंद स्कूल, हिंदू ज्ञान मंदिर व डॉ.पंजाबराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहर स्वच्छतेला सुरुवात केली व शहराचे प्रमुख मार्ग झाडून कचरा गोळा करून नगर परिषद यंत्रणेच्या माध्यमातून कचरा शहराबाहेर वाहून नेण्यात आला.
नगरस्वच्छता अभियानात आमदार विजय वडेट्टीवार, नगराध्यक्ष रिता उराडे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, पोलीस उपविभागीय अधिकारी रिमा जनबंधू व इतर अधिकारी, लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.
दुपारी २ वाजता शहराच्या प्रमुख मार्गानी रॅली काढण्यात आली. यात विविध देखावे साकारण्यात आले होते. रॅलीमधील बेटाळा पॉलिटेक्निक महाविद्यालायाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य, ख्रिस्तानंद स्कूलचा स्वच्छता संदेश देणारा देखावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे बेटी बचाओ रॅली, घोड्यांची वरात, लोकमत सखी मंच, सांझ विहार ग्रुपचा विशिष्ठ पेहराव देखावा, दिंडी, आदिवासी नृत्य नागरिकांना आकर्षित करीत होते.
रॅलीची सांगता महोत्सव ठिकाणी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)