भद्रावती शहरात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:01 IST2018-09-07T00:00:46+5:302018-09-07T00:01:17+5:30
शहरातील भांदक चेक पोस्ट जवळील बीएसएनएलच्या संरक्षण भिंतीलगतच्या छत्रपती ले आऊटमधील स्रेहल तथा गौतम नगरला लागून असलेल्या झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले आहे.

भद्रावती शहरात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : शहरातील भांदक चेक पोस्ट जवळील बीएसएनएलच्या संरक्षण भिंतीलगतच्या छत्रपती ले आऊटमधील स्रेहल तथा गौतम नगरला लागून असलेल्या झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले आहे.
बुधवारी रात्री ९ वाजता ताडाळी भागातून हा पट्टेदार वाघ अचानक आला. गुरुवारी सकाळी अनेकांना वाघाचे दर्शन झाले. वाघाच्या या धुमाकूळाने परिसरातील तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली होती. शेवटी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांच्या मार्गदर्शनात टायगर रॅपीड अॅक्शन, फॉरेस्ट कमांडो पथक वनविभागाच्या अधिकारी व चमूने तसेच इको - प्रोच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पट्टेदार वाघााला जंगलाच्या दिशेने हाकलून लावले. यावेळी भद्रावती शहरातील नागरिकांनी पट्टेदार वाघाला पाहण्यास मोठी गर्दी केली होती.
गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलीस, आयुध निर्माणी चांदाचे डी.एस.सी. जवान पथक व चंद्रपूरच्या दंगा नियंत्रण पथकाच्या दोन वाहनांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान आयुध निर्माणीचे कर्नल, जिल्हा वन अधिकारी ए. एल. सोनकुसरे ठाणेदार बी. डी. मडावी, एसटीपीएफ प्रमुख योगिता मडावी, वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर. आक्केवार हे याठिकाणी दाखल झाले होते.
सदर पट्टेदार वाघ हा सीटीपीएस क्षेत्रातील वाघिणीच्या ४ पिलांपैकी एक असून तो ताडाळी धारीवाल पावर प्रोजेक्टकडून गोरजा तलाव, कोंढाळी या गावांकडून रेल्वेच्या टॅक मार्गाने मोहबाळा, पॉवर ग्रिड भागातून शिकारीच्या शोधात आला असावा, असा अंदाज महेशकर यांनी वर्तविला. या वाघाचे वय अंदाजे २ वर्षाचे असल्याचे सांगण्यात आले.
सकाळी ६ वाजतापासून भद्रावती क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक हनवते, कांबळे, इको प्रोचे संदिप जिवणे, शुभम मेश्राम, ओमदास चांदेकर, विलास येरणे, श्रीपाद भाकरे, आदींनी वाघाला पळविण्यास सहकार्य केले. मात्र अद्याप वाघ त्याच परिसरात आहे
आला त्याचे मार्गाने जाणार
वाघाच्या जाण्याची चाहुल लक्षात घेता आलेला पट्टेदार नर प्रजातीचा वाघ आला, त्या मार्गानेच मार्गक्रमण करीत जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकर यांनी सांगितले. तरीही वाघाच्या हालचालीवर वनविभागाची चमू नजर ठेवून असल्याचेही ते म्हणाले.