सैराट वाहनचालकामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:19+5:302021-01-13T05:13:19+5:30
मूल : येथील विश्रामगृह मार्गावर मागील अनेक दिवसांपासून काही युवक सैराट वाहन चालवित असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ...

सैराट वाहनचालकामुळे नागरिक त्रस्त
मूल : येथील विश्रामगृह मार्गावर मागील अनेक दिवसांपासून काही युवक सैराट वाहन चालवित असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
मूल शहरातील विश्रामगृह मार्ग हा अंत्यत वर्दळीचा आहे. या मार्गावर शैक्षणिक संस्था असल्यामुळे काही युवक दुचाकी वाहन भरमसाट वेगाने चालवित असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मूल नगरपालिकेने अशा स्टंटबाजी करणाऱ्या युवकांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने रस्त्यावर गतिरोधक लावलेले आहे; परंतु हे युवक गतिरोधकावरूनही वेगाने वाहन चालवित असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
या मार्गावर काही दारूविक्रेतेही सैराट वाहन चालवितात. विनानंबरच्या वाहनाचा वापर करून वेगाने वाहन चालवित असल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे. दारूविक्रेत्यांनी आपले डोके वर काढले असून मूल शहरात दारूविक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर येणाऱ्या दिवसांत मूल शहरात अनेक दारूकिंग जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. अल्पवयीन मुलेही दुचाकी वाहनाने दारूविक्री मोठ्या प्रमाणावर करीत असून या व्यवसायात आकंठ गुंतलेले आहेत. हे दारूविक्रेते सुसाट वेगाने वाहन चालवित असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.