ग्रामपंचायत विरोधात नागरिकांचा ठिय्या
By Admin | Updated: March 16, 2015 00:46 IST2015-03-16T00:46:32+5:302015-03-16T00:46:32+5:30
येथील ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आलेली नळ योजना विद्युत देयक न भरल्याने अनेकदा बंद पडली.

ग्रामपंचायत विरोधात नागरिकांचा ठिय्या
गोंडपिपरी : येथील ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आलेली नळ योजना विद्युत देयक न भरल्याने अनेकदा बंद पडली. याबाबत अनेक तक्रारी करूनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी गांधी चौक येथे ठिय्या आंदोलन केले. मात्र शनिवारपासून बंद पडलेली नळ योजना पूर्ववत सुरू झाल्याने सदर आंदोलनाला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
स्थानिक ग्रामपंचायत मार्फत नागरिकांच्या सुविधेकरिता कार्यान्वीत असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक महिण्यात वीज बिल न भरल्यामुळे बंद पडली. यामुळे अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती तसेच नागरिकांच्या समस्यांकडे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ता गणेश डहाळे, अश्विन कुसनाके, संजय झाडे यांच्या नेतृत्वात आज येथील गांधी चौक येथे ग्रामपंचायत विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मात्र कालपासूनच नळयोजना पूर्ववत सुरू झाल्याने ठिय्या आंदोलनाला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद होता.
तर ग्रामपंचायतीच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या कार्यकर्त्याऐवजी इतर कुठल्याही नागरिकांनी आजच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे आंदोलन केवळ देखावा ठरल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)
गेल्या अनेक महिन्यांपासून येथील काही तरुण मंडळी, सामाजिक कार्यकर्त्या असल्याचे सांगत आपली राजकीय खेळी साधण्यासाठी ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र आज झालेल्या ठिय्या आंदोलनाला नागरिकांनी भिख घातली नाही. याचाच अर्थ आंदोलन हे केवळ काही तरुणांचे रचलेले षडयंत्र असून केवळ पदाधिकाऱ्यांची बदनामी करणे हेच त्यामागील हेतू होता.
- सुनील डोंगरे,
सरपंच गोंडपिंपरी