जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:30 IST2021-04-09T04:30:28+5:302021-04-09T04:30:28+5:30

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने मंगळवारी ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत निर्बंध लागू ...

Citizens rush to buy essentials | जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने मंगळवारी ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत निर्बंध लागू केले. गुरुवारी चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात असलेल्या किराणा व धान्य दुकानात नागरिकांनी गर्दी केली. फळ विक्रेत्यांना परवागनी असल्याने बरीच दुकाने सुरू होती. गोलबाजारात यापूर्वी सुरू असलेल्या विविध किरकोळ वस्तू विक्रेत्यांनी मनाई केल्याने वर्दळीच्या मार्गावर शुकशुकाट होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मनपाचे पथक गस्त घालत होते. गांधी चौकात काही खर्रा विक्रेत्यांनी टपरी सुरू केल्याचे दिसताच पथकाने त्यांना हटविले. तुकूम, बंगाली कॅम्प, बाबूपेठ व भिवापूर वार्डातील रस्त्यावरील लहान विक्रेत्यांना मनपा पथकाने दुकाने गुंडाळण्याच्या सूचना दिल्या. गांधी चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

सराफा, कापड बाजार कडकडीत

सरापा, कपडा लाईनमध्ये गुरुवारी दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट दिसून आला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे राज्य सरकार सुधारित आदेशाची व्यापाऱ्यांना प्रतीक्षा आहे. चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांनी आजही ‘ब्रेक द चेन’ला विरोध केला आहे.

भाजीबाजारात दरवाढ

चंद्रपुरातील मुख्य भाजी बाजारात आज भाजीपाल्याची आवक झाली. मात्र, निर्बंधामुळे शेकडो टन माल घटला. नागपूर व अन्य ठिकाणांतून भाजीपाला आला नाही. त्यामुळे दरवाढ झाली. या बाजारातून किरकोळ भाजीपाला विकत घेऊन शहरात हातठेल्याद्वारे विकणाऱ्यांची संख्या बरीच होती. निर्बंधामुळे बऱ्याच विक्रेत्यांनी गुरुवारी भाजीपाला विकत घेतला नाही.

Web Title: Citizens rush to buy essentials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.