ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी नागरिक रस्त्यावर
By Admin | Updated: August 7, 2016 00:32 IST2016-08-07T00:32:39+5:302016-08-07T00:32:39+5:30
ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा, ही मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांसह इतरही गावांनी मागील अनेक वर्षांपासून शासनाकडून रेटून धरली आहे.

ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी नागरिक रस्त्यावर
कडकडीत बंद : मोर्चात हजारो नागरिकांची उपस्थिती
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा, ही मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांसह इतरही गावांनी मागील अनेक वर्षांपासून शासनाकडून रेटून धरली आहे. मात्र प्रत्येक वेळी ब्रह्मपुरीला डावलले जात आहे. अशातच आता शासनाने नवीन जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव मागितला आहे. मात्र यावेळी अनेक तालुक्यांकडूनही जिल्ह्याची मागणी आहे. यावेळी तरी ब्रह्मपुरीला डावलले जाऊ नये, शासनाने ब्रह्मपुरीचा जिल्ह्यासाठी गांभीर्याने विचार करावा व जिल्ह्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी आज शनिवारी हजारो नागरिक रस्त्यावर आले. यासोबतच ब्रह्मपुरी तालुक्यात कडकडीत बंदही पाळण्यात आला.
जिल्हा निर्माण कृती समिती, युवा जिल्हा कृती समिती, ज्येष्ठ नागरिक संघटना, सिनीअर सिटीझन फोरम, महिला आघाडी, व्यापारी मंडळ यांच्यासह सर्वपक्षांचे नेते व कार्यकर्त्यांनी या बंदचे आवाहन केले होते. त्या नुसार, शनिवारी सकाळपासूनच ब्रह्मपुरी शहरासह तालुक्यातील दुकाने, शाळा, महाविद्यालये, भाजी मंडी व इतर प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आली. शेकडो युवकांनी मोटरसायकल रॅली काढून आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. त्यानंतर सर्व नागरिक हुतात्मा स्मारकाजवळ एकत्रित आले. महिला, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन युवक, नेते, पदाधिकारी, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर यांचा यात समावेश होता. त्यानंतर तिथूनच मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सम्राट अशोक चौक, रेणुकामाता चौक, सावरकर चौक आदी मार्गाने घोषणा देत मोर्चा शिवाजी चौकाकडे निघाला. शिवाजी चौकात मोर्चाला अडविण्यात आले. तिथेच उपविभागीय अधिकारी उमेश काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण परदेशी यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले.
मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी केले. यावेळी अशोक भैय्या, अॅड. गोविंद भेंडारकर, अशोक रामटेके, नगराध्यक्ष योगिता बनपूरकर, माजी नगराध्यक्ष रिता उराडे, खेमराज तिडके, माजी आमदार उध्दव सिंगाडे, विनोद झोडगे, प्रा. राजेश कांबळे, सुधीर शेलोकर, हरिश्चंद्र सोले, डॉ. प्रेमलाल मेश्राम, प्रभाकर सेलोकर, डॉ. डी.एन. मेश्राम, सुयोग बाळबुध्दे, प्रतिभा फुलझेले, सर्व नगरसेवक व हजारो नागरिक उपस्थित होते. जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. मोर्चात तालुक्यातील तरुणाई उत्साहाने सहभागी झाली होती. त्यांच्या घोषणामुळे ब्रह्मपुरी दुमदुमले.
ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी तशी १९८२ पासूनची आहे. परंतु वारंवार शासनाने याकडे वारंवार दुर्लक्षच केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याचे पडसाद या मोर्चात उमटले. नागरिकांच्या भावना या मोर्चाच्या निमीत्ताने पुन्हा उफळून आल्या. आता पुन्हा शासन चंद्रपूर जिल्ह्याची विभागणी करण्याच्या विचारात आहे. यावेळी तरी ब्रह्मपुरी जिल्हा घोषित करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा आणि बंदचे हे आयोजन होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. (तालुका प्रतिनिधी)
आजच्या मोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. २० पोलीस अधिकारी व २०० च्या वर पोलीस, दंगा नियंत्रक पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण परदेशी व पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर हे वेळोवेळी परिस्थितीची माहिती घेत होते. तरीही विद्यानगर व आमले बी.एड. कॉलेज परिसराच्या रस्त्यावर टायर जाळून मागणीकडे लक्ष वेधण्यात आले.