तळोधीतील घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: November 15, 2014 01:33 IST2014-11-15T01:33:38+5:302014-11-15T01:33:38+5:30
राईस सिटी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्धीस असलेल्या तळोधी (बा.) या गावाला कचऱ्याचा विळखा पडला असून त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तळोधीतील घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
तळोधी (बा) : राईस सिटी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्धीस असलेल्या तळोधी (बा.) या गावाला कचऱ्याचा विळखा पडला असून त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या विषयात मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामविकास अधिकाऱ्यांना कोणतेही सोयरसुतक नाही. या प्रकाराकडे जाणिवपूर्वक कानाडोळा केल्या जात असल्याने तळोधी (बा) येथील नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.
तळोधी (बा) हे गाव नागभीड तालुक्यातील मोठे गाव असून या गावाची राईस सिटी म्हणून जिल्ह्यात ओळखही आहे. पण येथील बसस्थानकावर उतरून गावात प्रवेश करताच, मुख्य प्रवेशद्वारापासून ५० मिटर अंतरावर मानवी विष्ठा आणि कचऱ्याचे ढिगारे नागरिकांचे स्वागत करतात. गावातील कोणत्याही रस्त्याने गेल्यास रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीमध्ये पाण्याचे व घाणीचे डबके साचलेले दिसते. तसेच ग्रामपंचायतीकडून गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडे कोणतेही नियोजन नसल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून गावाला लागूनच मोकळी जागा मिळेल तिथे कचरा टाकतात. त्यामुळे गावाच्या सभोवताल कचऱ्याचे ढिग उभे असलेले दिसत आहे.
येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील भागात पशुवैद्यकीय दवाखाना असून या इमारतीमध्ये सर्वत्र झाडे झुडपे वाढलेली आहेत, तर दवाखान्याच्या प्रवेशद्वारावरच कोंबडी व बकऱ्यांची दुकाने आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या मागील भागात कोंबड्याची पिसे, मासाचे तुकडे पसरले असून घाणीचे साम्राज्य पसरले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभोवताल सुद्धा खर्रा खाणाऱ्यांकडून सर्वत्र प्लास्टीकच्या पन्न्या फेकलेल्या दिसतात. आरोग्य केंद्राच्या मागील भागात दवाखान्यातील कचऱ्याचा ढिग साचलेला आहे. इमारतीच्या आतील भागातसुद्धा असणाऱ्या झाडाचा कचरा उचलून टाकण्याऐवजी झाडाच्या बुंध्याशी जमा केलेला दिसत आहे. येथे भरती रुग्णांची नेहमी गर्दी असते. परंतु त्यांचेसोबत राहणाऱ्यासाठी कोणतेही व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईकांकडून दवाखान्याच्या मुख्य दारातच स्वयंपाक केला जातो. त्यामुळे सर्वत्र धुराचे व काडीकचऱ्याचे साम्राज्य पहायला मिळत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रच नव्हे तर खासगी वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. बोरकर यांच्या दवाखान्यासमोरील रस्त्यावर असणारी घाण, डॉ. देशमुख यांच्या दवाखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर असणारा कचरा, डॉ. सहारे यांच्या दवाखान्याच्या दोन्ही बाजुला असलेले कचऱ्यांचे ढिगाऱ्यांमुळे डासांच्या उत्पत्तीत वाढ होत आहे. त्यामुळे गावात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या भागाचे आमदार बंटी भांगडिया यांच्याच गटाची ग्रामपंचायतीवर सत्ता असूनही मागील दोन वर्षांपासून गावाच्या विकासासाठी कोणताही कार्यक्रम राबविला नाही किंवा जनतेच्या समस्यांची दखल घेतली नाही. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाची साधी दखलही ग्रामपंचायतीने अद्यापही घेतली नसल्याने गाव घाणीच्या विळख्यात आहे. (वार्ताहर)