विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
By Admin | Updated: October 19, 2015 01:40 IST2015-10-19T01:40:04+5:302015-10-19T01:40:04+5:30
राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरातील विजेच्या लपंडावामुळे नागरिक वैतागले आहे.

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
पाण्याची टंचाई : कमी-अधिक दाबामुळे वीज उपकरणात बिघाड
देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरातील विजेच्या लपंडावामुळे नागरिक वैतागले आहे.
अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या देवाडा परिसरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे नेहमीच ये-जा सुरू असते. नागरिक विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळली आहे. मागील कित्येक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई भासत असून महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विजेच्या कमी अधिक दाब व सतत होणाऱ्या विजेचा लपंडावामुळे वीज उपकरणात बिघाड होत असून काही उपकरणे जळाल्याची माहिती आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू असून नागरिकांची अनेकदा गैरसोय होत आहे.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. घटस्थापना, शारदा नवरात्रारंभ, दसरा, मोहरम (ताजिया), कोजागिरी पोर्णिमा, लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा, भाऊबीज, गुरूनानक जयंती यांच्यासह अनेक सण एका पाठोपाठ येत असून हे सण नागरिक साजरे करण्याचा मन:स्थितीत असताना रात्रंदिवस वीज खंडीत होण्याचे प्रकार देवाडासह सिद्धेश्वर, लक्कडकोट, भुर्रकुंडा, कावळगोंदी, देवापूर, भेंडवी, उमरझरा, काकळघाट, गेरेगुडा, सुकडपाली, आनंदगुडा, जगुगुडा, खिर्डी, सोनुर्ली, कोष्टाळा, घोटरा, देवाडा परिसरातील गावात घडत आहे. हा परिसर अतिदुर्गम भागात मोडत असून या भागात बहुतांश आदिवासी जमात वास्तव्याला आहे. अंधाराचा फायदा घेत जंगली डुक्कर, वन्यप्राणी शेतकऱ्यांची शेती गावालगत असल्यामुळे शेतीमध्ये हैदोस घालत आहे. तेव्हापासूनच नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील एका महिन्यापासून वीज पाच मिनिटे राहते तर अर्धा तास जाते. वीज किती वेळा जाते अन् किती वेळा येते, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या व्यवसायिकांना जीवण जगणे कठीण झाले आहे. त्यातच वारंवार बंद होणाऱ्या विजेमुळे ओलीत करणारा शेतकरी वर्गसुद्धा त्रस्त झाला आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अलिकडे तर १२ तासाचे भारनियमन होत असल्याचे जाणवते. विजेवर चालणारे उद्योग धंदे प्रभावित झाले आहे.
लहान आटाचक्की, कांडप केंद्र, इलेक्ट्रानिक्स वस्तु विकणारे व दुरुस्ती करणारे आदी धंदे धोक्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या परिसारतील वीज पुरवठा नसल्यासारख्याच असतो. मात्र वीज देयके तेवढेच.
याबाबत अनेक वेळा नागरिक महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारतात. मात्र समाधान केले जात नाही. (वार्ताहर)