सोसायटीच्या दुर्गंधीने नागरिक बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST2021-03-14T04:25:53+5:302021-03-14T04:25:53+5:30
नागभीड : येथील प्रायमरी टीचर्स सोसायटीच्या सांडपाण्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक बेजार झाले आहेत. नगर परिषदेने या दुर्गंधीवर तोडगा काढण्याची ...

सोसायटीच्या दुर्गंधीने नागरिक बेजार
नागभीड : येथील प्रायमरी टीचर्स सोसायटीच्या सांडपाण्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक बेजार झाले आहेत. नगर परिषदेने या दुर्गंधीवर तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी आहे.
येथील पंचायत समितीच्या परिसराजवळ आणि नागभीड - ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गावर प्रायमरी टीचर्स सोसायटी आहे. या सोसायटीच्या मालकीचे एक सभागृह असून या सभागृहात वर्षभर विवाह समारंभ, साक्षगंध, सभा संमेलन, वाढदिवस आदी विविध कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोसायटीच्या सभागृहातच कार्यक्रमाचे जेवण होत असतात. या सभागृहाचे स्वयंपाकगृह सभागृहाच्या मागील भागास असून कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाच्या अनुषंगाने तयार होणारे खराब पाणी, उरलेले अन्न, भांडी घासल्यानंतर भांडी धुतलेले पाणी आणि शिळे अन्न येथील वसाहतीच्या बाजूला वाहत येते आणि तिथेच कुजते. या कुजलेल्या अन्नावर डुक्कर, कुत्री दिवसभर लोळत असतात. त्यामुळे आणखीच घाण तयार होत आहे.
या टीचर्स सोसायटीला लागूनच एक मोठी वसाहत आहे. या कुजलेल्या अन्नापासून तयार झालेल्या चिखलाची मोठी दुर्गंधी वसाहतीत येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हवेच्या झुळकीबरोबर दुर्गंधी संपूर्ण वसाहतीत शिरत असते. वसाहतीमधील नागरिकांनी यासंदर्भात नगर परिषदेकडे तक्रार केली आहे. नगर परिषदेने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
कोट
टाकलेल्या आणि शिळ्या अन्नामुळे येथे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. परिणामी लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. नगर परिषदेने यावर त्वरित तोडगा काढावा.
- श्रीकांत पिसे, स्थानिक रहिवासी