सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली दारू
By Admin | Updated: November 8, 2014 22:34 IST2014-11-08T22:34:38+5:302014-11-08T22:34:38+5:30
मध्यरात्रीची वेळ, पोलिसांची गस्त, अशातच पोलीस उपविभागाच्या कर्मचाऱ्यांचे वाहन एका अवैध दारु भरलेल्या गाडीचा पाठलाग करते. या भानगडीत चांदगावच्या वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण

सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली दारू
एक गंभीर जखमी : आरमोरी मार्गावरील घटना
ब्रह्मपुरी : मध्यरात्रीची वेळ, पोलिसांची गस्त, अशातच पोलीस उपविभागाच्या कर्मचाऱ्यांचे वाहन एका अवैध दारु भरलेल्या गाडीचा पाठलाग करते. या भानगडीत चांदगावच्या वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होते आणि पोलिसांच्या हाती एक लाख रुपयांची अवैध दारु लागते. हा सिनेस्टाईल प्रकार शुक्रवारी आरमोरी मार्गावर घडला. यात वाहक मात्र गंभीर जखमी झाला. ब्रह्मपुरी पोलिसांनी त्याला उपचारार्थ नागपूरला हलविले आहे.
काल शुक्रवारी मध्यमरात्रीच्या सुमारास येथील पोलीस उपविभागाचे कर्मचारी यांना अवैध दारुची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी आरमोरी मार्ग गाठला. एम.एच. ३१- डीसी- ६२९२ या क्रमांकाची मारोती इको गाडी ब्रह्मपुरीच्या दिशेने येत होती. पोलिसांना संशय येताच त्यांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. आरोपींच्या गाडीचालकालादेखील पोलीस मागे असल्याचा संशय आल्याने त्यानेही वाहन पळविणे सुरू केले. आरोपींनी वाहन शिवाजी चौकातून चांदगावच्या जंगलाकडे वळविले. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला.
चांदगावच्या वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने आरोपींचे वाहन उलटले. या अपघातानंतर दारूच्या बॉटल्स बाहेर आल्या. वाहक जयपाल प्रल्हाद नाकतोडे रा. उदापूर हा गंभीर जखमी झाला.
तर चालक घटनास्थळावरून फरार झाला. जखमीला उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यात एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला. (तालुका प्रतिनिधी)