ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये आनंदाला उधाण
By Admin | Updated: December 25, 2016 01:18 IST2016-12-25T01:18:50+5:302016-12-25T01:18:50+5:30
ख्रिस्त जन्मानिमित्त नाताळसाठी शहरासह जिल्ह्यातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये आनंदाला उधाण
ख्रिस्त जन्म सोहळा : विविध कार्यक्रमांचे आयोजन
चंद्रपूर : ख्रिस्त जन्मानिमित्त नाताळसाठी शहरासह जिल्ह्यातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ख्रिसमसच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. ख्रिस्त जन्म सोहळा शनिवार रात्रीपासून सुरू होत आहे. रविवारी सकाळी व सायंकाळी कार्यक्रम राहणार आहेत.
चंद्रपूर शहरात सेंट अँड्र्यूस अर्थात संत आंद्रिया चर्च महत्त्वाचा मानला जातो. इ.स. ६० च्या दरम्यान प्रभु येशू ख्रिस्ताचा शिष्य होऊन संत अंद्रिया यांनी लोकांना सेवा दिली. १९०२ मध्ये मिशन कार्याची पाहणी व विश्वास असणाऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी संत अंद्रिया चर्चची कोनशिला लावण्यात आली. या चर्चला विद्युत रोषणाईने शुक्रवारपासून सजविण्यात आले आहे. या चर्चमध्ये सांताक्लॉजचे मोठे कटआऊट लावण्यात आले आहे. तसेच ख्रिस्त जन्माचा आकर्षक देखावा तयार करण्यात आला आहे. तेथे रविवारी सायंकाळ ६.३० वाजतापासून कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे. पास्टर सुनील गोडबोले येशू ख्रिस्तांचा संदेश देणार असून त्यानंतर गितांचे गायन केले जाईल. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या भक्तांकरिता भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती चर्चचे सचिव प्रदीप देवगडे यांनी दिली.
शहरामध्ये बल्लारपूर बायपास मार्गावर रय्यतवारी येथे लव्ह इंडिया फॅमिली चर्च स्थापन करण्यात आले आहे. या चर्चवरही विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. चर्चच्या आतामध्ये क्रॉसला चमकते दिवे लावण्यात आले आहेत. रविवारी सकाळी ८ वाजता पास्टर सुनील जॉर्ज कुमार, पास्टर अशोक साह, पास्टर रवीश घोटेकर आदी भक्तांना संदेश व सेवा देणार आहेत. त्यानंतर रविवारी सायंकाळी ख्रिस्त जन्माचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याची माहिती लव्ह इंडिया परिवाराचे सचिव सुनील नळे यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे सुमारे ३५ हजार ख्रिस्ती समाजबांधव हे प्रॉटेस्टंट पंथाचे आहेत. नागपूर चर्च काऊंसिल हे त्यांचे धर्मपीठ आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ८० चर्च असून बहुतांश लोक हे प्रॉटेस्टंट पंथाचे असल्याची माहिती पास्टर सुनील जॉर्ज कुमार यांनी दिली.
तुकूमधील सेंट थॉमस चर्चमध्ये शनिवारी रात्री ११.३० वाजता पार्थना होणार आहे. त्यानंतर केक कापून ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. पास्टर बेन्नी भाविकांना संदेश देणार आहेत. बाबुपेठ येथील जीवन ज्योती चर्चेमध्ये रविवारी सकाळी ९ वाजता प्रार्थना होणार आहे. यावेळी पास्टर मथॉयस परागे संदेश देणार आहेत.
भिवापूर भागात इंटरनल लाईट फेलोशीप चर्चमध्ये रविवारी सायंकाळी ६.३० वाजता प्रार्थना आयोजित करण्यात आली असून केक कापण्यात येणार असल्याचे पास्टर सुनील बकाली यांनी सांगितले. रोमन कॅथॉलिक पंथाच्यावतीने मूल मार्गावरील सभागृहात ख्रिसमस निमित्त केक कापण्यात येणार आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. (प्रतिनिधी)