क्रांती जिल्ह्यासाठी चिमूरकर धडकले
By Admin | Updated: August 5, 2016 00:50 IST2016-08-05T00:50:09+5:302016-08-05T00:50:09+5:30
नवीन चिमूर क्रांती जिल्हा करण्यात यावा, अशी मागणी करीत चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती, व्यापारी संघटना, सर्व पक्षीय नेते यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला.

क्रांती जिल्ह्यासाठी चिमूरकर धडकले
सहा हजारांच्यावर उपस्थिती : तालुक्यातील व्यापारपेठा कडकडीत बंद
राजकुमार चुनारकर/अमोद गौरकार चिमूर
नवीन चिमूर क्रांती जिल्हा करण्यात यावा, अशी मागणी करीत चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती, व्यापारी संघटना, सर्व पक्षीय नेते यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व स्वातंत्र्य संग्राम सैनिक काळे गुरुजी यांनी केले. नवीन जिल्ह्याच्या मागणीसाठी चिमूर शहरासह भिसी, शंकरपूर, नेरी, जांभूळघाट आदी गावांमधील व्यापाऱ्यांनीही १०० टक्के बाजारपेठा बंद ठेवून मोर्चाला समर्थन दिले. अल्पावधीत मोर्चाचे आयोजन करुनही सहा हजारांपेक्षा अधिक चिमूरकर मोर्चात सहभागी झाले.
चिमूर शहरात १६ आॅगस्ट १९४२ ला झालेली क्रांती पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळात चिमूर जिल्हा (परगणा) म्हणून अस्तित्वात असल्याची नोंद शासन दरबारी आहे. चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी ४६ वर्षे जुनी आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना चिमूर जिल्ह्याच्या मागणीची तळमळ लक्षात आणून देण्याकरिता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
चिमूरच्या प्रसिद्ध बालाजी मंदिराच्या प्रांगणात सर्व राजकीय पुढाऱ्यासह, व्यापारी मंडळ, जिल्हा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिक, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर बालाजी मंदिरातून निघालेल्या मोर्चात चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, नगराध्यक्षा शिल्पा राचलवार, जि.प. माजी अध्यक्ष सतीष वारजूरकर, सभापती वैशाली येसाबंरे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद बारापात्रे, सचिव नीलम राचलवार, शिवसेना नेते गजानन बुटले, माधव बिरजे, धरमसिंह वर्मा, विलास डांगे, डॉ. दिलीप शिवरकर, किशोर अंबादे, इकलाखभाई कुरेशी, अरविंद सादेकर आदी सहभागी झाले. हा मोर्चा डोंगरवार चौक, नेहरु चौक या मुख्य मार्गाने निघाला. दरम्यान, चिमूर जिल्हा मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चाला पोलिसांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रोखले. त्यानंतर जिल्हा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी संगिता राठोड यांना देण्यात आले. यापूर्वीच्या मोर्चात निवेदन स्वीकारताना तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्चाला समोरे न गेल्याने मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीची राखरागोंळी केली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी राठोड यांनी स्वत: मोर्चाला समोरे जात निवेदन स्वीकारले.
तालुक्यातील बाजारपेठा कडकडीत बंद
चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला चिमूर शहरासह नेरी, शंकरपूर, भिसी व जांभूळघाट येथील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या. दरम्यान, शंकरपूर येथील नागरिकांनी स्वयंस्फूतपणे चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांमार्फत पाठविले.
नेरी व परिसरात कडकडीत बंद
नेरी : चिमूर क्रांती जिल्ह्याच्या समर्थनार्थ गुरुवारी चिमूर तालुका १०० टक्के कडकडीत बंद होता. चिमूर येथील मोर्चाच्या समर्थनार्थ नेरीतही कडकडीत बंद ठेवण्यात आला. संपूर्ण बाजारपेठ बंद होती. विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याच्या मागणीला समर्थन दिले.
शभंरीतल्या तरुणाने केले नेतृत्व
चिमूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक दामोधर लक्ष्मण काळे (गुरुजी) मागील ४६ वर्षांपासून चिमूर जिल्ह्याची मागणी करीत आहेत. आज ९४ वर्षांचे असलेल्या काळे गुरुजी यांनी चिमूर क्रांती जिल्हा मोर्चाचे नेतृत्व करीत शासनाला चिमूर जिल्हा द्यावाच लागेल आणि आम्ही तो घेणारच, अशी भूमिका घेतली. चिमूर जिल्हा होईपर्यंत मी प्राण सोडणार नसल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.