चंद्रपूर : महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयाद्वारे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, चिमूरला शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व नागभीड या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत १९ महसूल मंडळे, ११३ तलाठी सजे व ६५२ गावांचा समावेश आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालय, चिमूरमध्ये ही गावे समाविष्ट करण्याबाबत काही आक्षेप असल्यास १५ दिवसांच्या आत संबंधित उपविभागीय कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
चिमुरात शासनाने अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केले. पदभरतीही मंजूर केली. ३० एप्रिल २०२० च्या आदेशान्वये अपर जिल्हाधिकारी पदावर नियुक्तीही केली. कार्यालय मात्र सुरू केले नाही. याबाबत चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी वारंवार पत्रव्यवहार केला. तरीही कार्यालय सुरू न झाल्याने जनतेत रोष असल्याचे सांगून बिकट स्थिती उद्भवण्याचा इशाराच आमदार भांगडियाने दिला होता. या बाबीला आठ दिवसांचा कालावधी लोटत नाही तोच जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे.