चिमुकली वनोद्यानात बंदिस्त, फुले तोडण्याची शिक्षा!
By Admin | Updated: August 29, 2016 01:18 IST2016-08-29T01:18:40+5:302016-08-29T01:18:40+5:30
चवथ्या इयत्तेतील एका चिमुकली विद्यार्थिनीला फुलांचा मोह रविवारी महागात पडला आहे. वनोद्यानातील फुले तोडल्याने तिला दोन तास तेथे बंदिस्त ठेवण्यात आले.

चिमुकली वनोद्यानात बंदिस्त, फुले तोडण्याची शिक्षा!
ुबी.यू. बोर्डेवार राजुरा
चवथ्या इयत्तेतील एका चिमुकली विद्यार्थिनीला फुलांचा मोह रविवारी महागात पडला आहे. वनोद्यानातील फुले तोडल्याने तिला दोन तास तेथे बंदिस्त ठेवण्यात आले. या संतापजनक प्रकाराने वन समितीने समर्थन करीत तिला शिक्षा फर्मावली.
रविवार असल्याने शाळेच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथील स्टेला मॉरिस कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी तेजस्विनी दिलीप वैरागडे ही आपल्या वडिलांसमवेत सकाळी ९.३० वाजता राजुरा येथील वनोद्यानात गेली होती. तेथे बागडत असताना विविधांगी रंगीबेरंगी फुलांनी तेजस्विनीचे मन आकर्षित झाले. तिचे वडील दिलीप वैरागडे यांनी तिला आधीच फुले न तोडण्याबाबत बजावले. परंतु बाल मनाला फुले भुरळ घालत होते.
तेजस्विनीला शाळेतील शिक्षिकेने फुलांचे प्रोजेक्ट करण्यास सांगितलेले होते. आपल्या शिक्षिकेने सांगितलेला प्रोजेक्ट तयार करण्यासाठी तिला उद्यानातील फुले तोडण्याचा मोह आला. तिने उद्यानातील काही फुले तोडली. ही बाब उद्यानातील कर्मचाऱ्याला समजली. कर्मचाऱ्याने ही प्रकरण वनसमितीकडे नेले. वन समितीच्या मते मुलीने उद्यानातील फुले तोडल्यामुळे उद्यानाचे नुकसान झाले. त्याकरिता नुकसान भरपाई म्हणून २०० रुपयांची मागणी तेजस्विनीचे वडील दिलीप वैरागडे यांच्याकडे करण्यात आली. पैसे न दिल्यास मुलगी उद्यानात ठेवण्याचे फर्माविण्यात आले.
वन समितीच्या नुकसान भरपाईच्या मागणीमुळे दिलीप वैरागडे संतप्त झाले. त्यांनी रागाच्या भरात मुलीला उद्यानात ठेवून घरी परत आले. त्यांच्याकडे २०० रुपयांची रक्कम नसल्याने हा निर्णय घेतला. त्यांनी मुलगी वनोद्यानात बंदिस्त असल्याची बाब नगरसेवक प्रा. अनिल ठाकुरवार यांना कळविली. त्यांनी ही घटना ‘लोकमत’ला सांगितली. त्यानंतर वनोद्यानात चौकशी केली तेव्हा तेजस्विनी एकटीच तेथे बसून असल्याचे आढळले. याप्रकरणी नगरसेवक प्रा. ठाकुरवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.
वनोद्यानासाठी हैदराबाद येथून विविध जातीची झाडे आणली आहेत. मुलीने फुले तोडली असल्याने २०० रुपये नुकसान भरपाई मागितली. परंतु तिच्या वडिलाने पैसे आणतो, असे सांगून मुलीला उद्यानात बसवून ठेवले.
- मारोती शिवनकर, सदस्य, वनसमिती वनोद्यान राजुरा.