सतीश जमदाडे लोकमत न्यूज नेटवर्कआवाळपूर : कोरपना तालुक्यात यंदा ८२० हेक्टर क्षेत्रात मिरची लागवड झाली. उत्पादनही चांगले झाले. २०२३ मध्ये २३ ते २५ हजार रुपये, २०२४ मध्ये १५ ते १७ हजार रुपये भाव होता. यंदा २०२५ मध्ये केवळ ७ते १० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. लागवडीचा खर्च देखील निघेल की नाही, या प्रश्नाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कापूस उत्पादक तालुका म्हणून परिचित असला तरी शेतकरी विविध पिके घेत आहेत. मिरची लागवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढली; परंतु दोन वर्षांच्या तुलनेत यंदा भाव कमालीचा घसरला. शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात अल्प दरात विक्री करीत आहे. मिरची उत्पादन घ्यायला खर्च बराच येतो.
शेतकरी कर्जाच्या खाईतमिरची लागवडीत आंतरमशागत खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये तण काढणे, खत देणे व मुळांभोवती माती चांगली करणे यांचा समावेश होतो. सुरुवातीला दर १५ दिवसांनी तण काढून खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे लागते. एवढा खर्च उचलण्यासाठी कर्ज काढावे लागते; पण मिरचीला मिळत असलेला दर समाधानकारक नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
"मिरचीला खर्च अधिक लागतो. त्यामुळे लहान शेतकरी याकडे वळत नाही. यावर्षी भाव कमी असल्याने पीक घ्यायचे कसे असा प्रश्न पडला आहे. शासनाने किमान १७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा तरच दिलासा मिळेल."- बापुराव सिदारेड्डी, शेतकरी, राजुरगुडा
"पाच एकरात मिरची लागवड केली; पण यंदा भाव कमी असल्याने मिरची शेती करणे परवडण्यासारखी स्थिती नाही. पिकविलेल्या मिरचीचे करायचे काय हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ भाववाढ करावी."- अविनाश काठे, शेतकरी नांदा