वनसडी परिसरात मिरची पीक करपले
By Admin | Updated: October 30, 2015 01:08 IST2015-10-30T01:08:27+5:302015-10-30T01:08:27+5:30
कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरातील बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात.

वनसडी परिसरात मिरची पीक करपले
लाखोंचा खर्च व्यर्थ : बोगस बियाणांचा फटका
वनसडी : कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरातील बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. त्यामुळे यावर्षीसुद्धा मिरचीची लागवड करण्यात आली. मात्र बोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे संपूर्ण मिरचीचे पिक पूर्णत: करपून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरवर्षी एकरी २० क्विंटल मिरची पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मात्र बोगस मिरची बियाणे कंपनीने लाखो रुपयांचा चुना लावला आहे.
पुर्वीपासून मिरचीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कृषी केंद्रातून बी.एन. आर. बियाणे, आॅक्सी बियाणे हे विनेज कंपनीचे बियाणे आणि सी.५ हे इंडम या कंपनी बियाणे तसेच १०४८ हे सिजेंटा या कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेऊन त्यानुसार बियाणांची लागवड करून रोपे लावण्यात आली.
बियाणांची लागवड केल्यानंतर उत्पादन चांगले व्हावे, यासाठी या पिकावर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त खर्च करायला सुरुवात केली. पण लाखो रुपयांचा खर्च करुनसुद्धा संपूर्ण मिरचीचे पिक सुकून गेले आहेत.
निसर्गाच्या अवकृपेमुळे अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.त्यात आता हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या २० वर्षांपासून एकरी २० ते ३० क्विंटल मिरची पीक घेणारे शेतकरी यावर्षी पूर्णपणे हतबल झालेले आहेत.
या वर्षीच्या हंगामात सर्व बियाणे कंपन्यांनी मिरचीचे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची फसवणूक केली आहे.
यासंदर्भात सर्व संबंधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोरपना येथील कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासोबतच शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनादेखील निवेदन देण्यात आले. करपलेल्या मिरची पिकाची पाहणी करुन आम्हाला बियाणे कंपन्यांकडून मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करावे, अशी मगणी केली आहे.
संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतात जावून मिरची पिकाची पाहणी करावी व एकरी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
मी गेल्या १० वर्षांपासून पाच ते १० एकर मिरचीचे उत्पन्न घेत आहे. दरवर्षी मला एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते. पण यावर्षी मिरची पिकावर लाखो रुपये खर्च करुनसुद्धा मिरचीची रोपे पूर्णपणे करपून गेली आहेत. या परिसरात पाच ते १० एकर मिरची पीक घेणारे शेतकरी आहेत. कंपनीने आम्हास योग्य तो मोबदला द्यावा, अशी आमची मागणी आहे.
- डॉ. देवराव ठावरी,
शेतकरी, वनसडी