मूल पालिकेचे सार्वजनिक वाचनालय झाले पोरके
By Admin | Updated: July 17, 2017 00:37 IST2017-07-17T00:37:45+5:302017-07-17T00:37:45+5:30
येथील नगर परिषदेने स्व. इंदिरा गांधी सार्वजनिक वाचनालय सुरू केले. मूल शहरात वाचन संस्कृतीला चालना मिळेल,

मूल पालिकेचे सार्वजनिक वाचनालय झाले पोरके
लाखोंची पुस्तके गायब : इमारतीचेही निघाले धिंडवडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : येथील नगर परिषदेने स्व. इंदिरा गांधी सार्वजनिक वाचनालय सुरू केले. मूल शहरात वाचन संस्कृतीला चालना मिळेल, असा यामागे हेतू होता. मात्र या वाचनालयाकडे पालिका प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने वाचनालय सध्या अडगळीत निघाले आहे. लाखो रुपयांची खरेदी केलेली अमुल्य पुस्तके कुठे गेली, त्याचा पत्ता नाही. दुसरीकडे इमारतीचेही धिंडवडे निघाले असून लोखंडी दारे व खिडक्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने इमारतीसह साहित्याचा खजिना पोरका झाला आहे.
नगर परिषद मूलची स्थापना १० सप्टेंबर १९८७ ला झाली. त्यापूर्वीपासून म्हणजे ग्रामपंचायत काळापासून स्व.इंदिरा गांधी सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले. या वाचनालयात विविध साहित्यिकांचे पुस्तके, कादंबऱ्यासह आत्मचरित्र व अनमोल ग्रंथही होते. यामुळे पूर्वी वाचनालयात वाचकांची गर्दी पहायला मिळायची. ताज्या घडामोडीची वाचकांना माहिती मिळावी म्हणून नियमित विविध वर्तमानपत्र मागविली जायची. मात्र नावारूपास आलेल्या या सार्वजनिक वाचनालयाला आता उदासीनतेचे ग्रहण लागले आहे.
वाचनालयातील पुस्तकांची वाढ करणे आवश्यक असताना पालिकेला ते महत्त्वाचे वाटले नाही. या उदासिनतेमुळे वाचनालय अडगळीत पडले आहे. कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने व कामाच्या बिलासाठी झटणाऱ्या न.प. प्रशासनाबरोबरच पदाधिकाऱ्यांनाही साहित्याच्या खजिन्याविषयी सोयरसूतक वाटले नाही. सदर वाचनालय आता जुगाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे.
येथे हजारो रुपयांचा जुगार खेळला जात असतानाही नगर पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. सदर वाचनालय सुरू राहावे, यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसल्याने आजच्या स्थितीत नगर पालिकेच्या इमारतीचे धिंडवडे निघाले आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
‘त्या’ ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार
तालुक्यातील नागरिकांमध्ये असलेली वाचनसंस्कृती कायम टिकून राहावी, यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय मूल शहरात सुरू करण्यात आले आहे. नगर पालिकेचे स्व. इंदिरा गांधी सार्वजनिक वाचनालय तत्कालीन न.प. प्रशासनाने बंद केले. त्या ठिकाणी असलेली रंगमंचाची इमारत पाडून येणाऱ्या काळात शापिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया मूल नगर पालिकेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांनी दिली.