बोगस मजूर सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सचिव मोकाटच
By Admin | Updated: April 15, 2016 01:21 IST2016-04-15T01:21:26+5:302016-04-15T01:21:26+5:30
तालुक्यातील देवाडा खुर्द येथे बोगस मजूर सहकारी संस्था स्थापन करुन शासनाची व सभासदांची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला.

बोगस मजूर सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सचिव मोकाटच
दोन महिन्यांपासून प्रतीक्षा : तक्रार करूनही दखल घेण्यास चालढकल
पोंभूर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे बोगस मजूर सहकारी संस्था स्थापन करुन शासनाची व सभासदांची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला. संस्थेअंतर्गत लाखो रुपयाची कामे करुन स्वहित जोपासणारे संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सचिवावर कार्यवाही करावी, यासाठी अन्यायग्रस्त सभासदांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. मात्र अद्यापही त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने ते मोकाटच आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला न्याय मिळणार काय, असा गंभीर प्रश्न अन्यायग्रस्त सभासदांनी केला आहे.
देवाडा खुर्द येथील साईकृपा मजूर सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक रुमाजी कवडू बुरांडे, त्यांचेच जावई सचिव संतोष नैताम, भाऊ पुंडलिक बुरांडे यांनी गावातील २८ सभासदांची बोगस नोंदणी करुन सन २०१०-११ मध्ये मजूर सहकारी संस्थेची स्थापना केली. वास्तविकता संस्थेची नोंदणी करताना सभासदांना विचारात घेणे आवश्यक होते. मात्र सभासदांना कुठलीच माहिती न देता परस्पर त्यांच्या नावाचे बीपीएल दाखले व त्यांच्या नावासमोर त्रयस्थ व्यक्तींचे पासपोर्ट लावून त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन बोगस संस्थेची स्थापना केली. यातील काही सभासद रोजगारासाठी बाहेरगावी राहतात तर काही मय्यत आहेत.
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबामध्ये दारिद्र्याचे जीवन जगणाऱ्या मजूर, अंगमेहनती व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून शासनाने ग्रामीण परिसरामध्ये मजूर सहकारी संस्थेला मान्यता दिली. परंतु, राजकीय पक्षाशी निगडीत असलेल्या व्यक्तींनी शासनाच्या या चांगल्या उद्देशाला हरताळ फासून सार्वजनिक बांधकााम विभागामार्फत ८० लाख रुपयाच्यावर कामे करुन यातून लाखो रुपयाची माया जमवली. त्यातून आपल्या कुटुंबाचा व स्वत:चा आर्थिक स्तर मात्र चांगलाच उंचावला आणि शासनाची व सभासदांची दिशाभूल केली.
याबाबत संबंधित अन्यायग्रस्त सभासदांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस स्टेशन, उपनिबंधक तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
परंतु, दोन महिन्याचा कालावधी लोटूनही या बोगस मजूर सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सचिवावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. ते मोकाटच फिरत असून सामान्य गरीब जनतेला न्याय मिळणार काय, असा प्रश्न अन्यायग्रस्त सभासदांनी केला आहे. कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सभासदानी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)