एक ‘तपा’पासून शेतकरी जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित

By Admin | Updated: November 15, 2015 00:36 IST2015-11-15T00:36:10+5:302015-11-15T00:36:10+5:30

शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाकडून तलावाची निर्मिती करण्यात येते.

From a 'check' the farmers are deprived of land compensation | एक ‘तपा’पासून शेतकरी जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित

एक ‘तपा’पासून शेतकरी जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित

ठिय्या आंदोलन : मोबदल्याच्या प्रतीक्षेतच तीन शेतकऱ्यांचा मृत्यू
खडसंगी: शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाकडून तलावाची निर्मिती करण्यात येते. चिमूर तालुक्यातील लघु सिंचाई विभागांतर्गत सन २००२ मध्ये डोंगर्ला येथील शेतकऱ्याची जमीन तलावासाठी व नहरासाठी जमीन शासनाने संपादित केली. मात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही दिला नसल्याने डोंगर्ला येथील शेतकऱ्यांना एका ‘तपा’पासून मोबदल्याची प्रतीक्षा आहे.
चिमूर तालुक्यात आजही ५२ हजार ७०० हेक्टर शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी निसर्गावर अवलंबून असतात. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकरी उत्पन्नापासून वंचित आहेत. परिणामी त्यांना आर्थिक विवंचनेत जीवन जगावे लागत आहे. या शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली संसाराचा गाडा चालवावा लागत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता शासन काही प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्था करीत आहे.
चिमूर तालुक्यातील कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी, यासाठी लघु सिंचाई विभागामार्फत तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावासाठी डोंगर्ला येथील अकरा शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करण्यात आली. त्यामध्ये केशव सिजु चौधरी व इतर यांची १.२२ हेक्टर आर, रामकृष्ण चौधरी (मय्यत) यांची ०.४९ हे.आर, माणिक लक्ष्मण चौधरी यांची १.६५ हे.आर, दिवाकर शिवराम जांभुळे १.२२ हे.आर., बाळकृष्ण शिवराम जांभुळे व इतर यांची ०.३५ हे.आर., योगराज जांभुळे व इतर यांची ०.१५ हे.आर., धनराज बाजीराव चौधरी यांची २.६५ हे.आर., मेघराज गोपाळा चौधरी ०.८५ हे.आर., बाजीराव नामा चौधरी (मय्यत) व इतर यांची ०.२५ हे.आर. व नथ्थु कवडू चौधरी यांची ०.४९ हे.आर. जमिनी संपादित केली. मात्र १२ वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने या आदिवासी शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. त्यामुळे हे शेतकरी अनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजावीत आहेत. मात्र शासनाच्या दप्तर दिरंगाईने या शेतकऱ्यांना आज नाही उद्या मोबदला देतो, अशा आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.
काही शेतकरी कार्यालयाच्या चकरा मारता मारता मृत झालेत. मात्र अजुनही त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, याकरिता स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयात ९ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनात अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: From a 'check' the farmers are deprived of land compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.