शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यास विकलेल्या सोयाबीनचे चेक बाऊंस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST2021-02-05T07:33:29+5:302021-02-05T07:33:29+5:30
वरोरा : तालुक्यातील माढेळी येथील परवानाधारक व्यापाऱ्याकडे शेतकऱ्यांनी मागील वर्षी सोयाबीन अनामतमध्ये ठेवले. यावर्षी विकलेल्या सोयाबीनची रक्कम चेक स्वरुपात ...

शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यास विकलेल्या सोयाबीनचे चेक बाऊंस
वरोरा : तालुक्यातील माढेळी येथील परवानाधारक व्यापाऱ्याकडे शेतकऱ्यांनी मागील वर्षी सोयाबीन अनामतमध्ये ठेवले. यावर्षी विकलेल्या सोयाबीनची रक्कम चेक स्वरुपात व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना दिले. मात्र, व्यापाराचे बँक खाते बंद झाल्याने दोन शेतकऱ्यांचे चेक वटलेच नाहीत. शेतकऱ्यांचे लाखो रुपये व्यापाऱ्याकडे असून दोन्ही शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
वरोरा तालुक्यातील माढेळी गावातील अमोल देवतळे या व्यापाऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोराकडून शेतमाल खरेदीचा परवाना प्राप्त केला. सदर व्यापारी मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करीत होता. याच व्यापाऱ्याने मागील वर्षी २०पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून सोयाबीन घेऊन अनामतमध्ये ठेवले. त्यानंतर यावर्षी सोयाबीनची किंमत निर्धारित करून शेतकऱ्यांना रक्कम द्यावयाची होती. परंतु व्यापारी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, उपसभापती देवानंद मोरे, सचिव चंद्रसेन शिंदे यांनी घेत व्यापारी अमोल देवतळे याच्याकडे शेतकऱ्याची रक्कम देण्याचा तगादा लावला. अखेर तक्रार करणाऱ्या २० शेतकऱ्यांची रक्कम परत दिली. त्यानंतर व्यापारी अमोल देवतळे याचा परवाना बाजार समितीने रद्द केला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांनी दिली. त्यानंतर २५ जानेवारी २०२१ला वरोरा तालुक्यातील वंधली येथील शेतकरी अविनाश भोयर यांचे ९२ हजार व माढेळी येथील पुरुषोत्तम चंदनखेडे यांचे एक लाख ४७ हजार रुपये असे दोन चेक व्यापाऱ्याने बँक खाते बंद केल्याने परत आले. त्यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांना रक्कम मिळू शकली नाही. याबाबत वरोरा पोलीस ठाणे, बाजार समिती व तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिल्याची माहिती शेतकरी पुरुषोत्तम चंदनखेडे यांनी दिली.
दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी तक्रार दिली. त्यांची रक्कम मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आपली फसगत टाळण्याकरिता बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्येच शेतमाल विक्रीस आणावा.
- राजेंद्र चिकटे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा.