ग्रामीण भागात स्मार्ट कार्डच्या नावाखाली फसवणूक
By Admin | Updated: February 15, 2015 00:42 IST2015-02-15T00:42:32+5:302015-02-15T00:42:32+5:30
भारत सरकारचे ‘आधार’ ओळखपत्र बंद होणार आहे. यानंतर नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ उपयोगी पडणार आहे, अशी थाप मारून बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून ...

ग्रामीण भागात स्मार्ट कार्डच्या नावाखाली फसवणूक
बल्लारपूर : भारत सरकारचे ‘आधार’ ओळखपत्र बंद होणार आहे. यानंतर नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ उपयोगी पडणार आहे, अशी थाप मारून बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून पैसे उखळण्याचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. ‘स्मार्ट कॉर्ड’ च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असून तहसील प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.
मागील चार-पाच दिवसांपूर्वी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे काही तरुणांनी स्मार्ट कॉर्ड तयार करून देण्याच्या नावाखाली आधार ओळखपत्र, निवडणूक ओळखपत्र, दोन पास पोर्ट फोटो व प्रत्येकांचे स्मार्ट कॉर्डसाठी प्रति व्यक्ति दहा रुपये जमा करण्याचे धोरण अवलंबिले. काहींनी याबाबत सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कागदपत्रे जमा करणाऱ्यांकडून अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. कोणाकडून परवानगी आहे, याची विचारणा केली असता टोलवाटोलवी करणारे उत्तरे देण्यात आल्याचा प्रकारही घडला आहे. यामुळे नागरिकांना लुबाडणूक करणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय बळावला आहे.
असाच प्रकार तालुक्यातील मानोरा, इटोली, कवडजई आदी गावातही सुरू झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. स्मार्ट कार्डच्या नावाखाली नागरिकांकडून जमा करण्यात येत असलेल्या कागदपत्राचा दुरूपयोग तर होणार नाही ना, अशी शंका नागरिकात वर्तविली जात आहे. सामान्य नागरिक या टोळीच्या भ्रामक जाळात अडकले जात आहेत. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात आहे.
‘स्मार्ट कार्ड’ कोणत्या एजन्सी मार्फत काढले जात आहे, याचा उलगडा आजतागायत झाला नाही. ‘आधार’ ओळखपत्र बंद करणार आहे, हे सांगण्याचे औचित्य काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘स्मार्ट कार्ड’ तयार करून देण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्राप्त स्थितीत जोर पकडला आहे. हे लोन इतरत्र पसरण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने यावर आळा घालणे आवश्यक असून याचा उलघडा त्वरित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
स्मार्ट कार्डच्या नावाखाली सामान्य नागरिकांची पैसे उखळून गोरखधंदा चालविणाऱ्या टोळीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनाकडे याची तक्रार मात्र अद्यापही कोणाकडून करण्यात आली नाही, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)