छप्परे उडाली, संसार उघड्यावर

By Admin | Updated: March 18, 2017 00:36 IST2017-03-18T00:36:08+5:302017-03-18T00:36:08+5:30

राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आलेल्या वादळामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाले.

Chappar blown up, the world opened | छप्परे उडाली, संसार उघड्यावर

छप्परे उडाली, संसार उघड्यावर

चिंचोलीत कहर
गोवरी : राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आलेल्या वादळामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाले. यात कोणतीही जिवित हाणी झाली नसली तरी घरांचे नुकसान होऊन अनेकांचा संसारच उघड्यावर आला. गोवरी-चिंचोली परिसरात अचानक सायंकाळी आलेल्या वादळाने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. यात चिंचोली (खुर्द) येथील अरुणा काळे, शरद टोंगे यांच्या घराची छप्पर उडाली. वादळाने किसन देवाळकर, कवडू भगत, गजानन वैद्य, संतोष देवाळकर, गणेश काळे यांच्या गोठ्यावरील टिनाचे पत्रे वाऱ्याच्या प्रचंड वेगाने उडून गेली. वादळाने सर्वत्र हाहाकार झाल्याने विस्कटलेला संसार व उडून गेलेले घरावरील लाकुड-फाटा शोधण्यासाठी एकच धावपड उडाली. अनेक शेतकऱ्यांनी शेतात गहू, हरभरा, तुरीची कापणी केली होती. मात्र सर्व पावसाने भिजले आहे. आठ दिवसापूर्वी मानोली, नागपूर, कढोली, कोलगाव परिसरात आलेल्या वादळाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. पुन्हा गुरूवारी वदाळाचा तडाखा बसला. चिंचोली येथील अरुणाबाई काळे, शरद टोंगे, कवडू भगत यांच्या राहत्या घरी १० क्विंटल कापूस ठेवला होता. मात्र वादळाने छप्पर उडाले व त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने लाख मोलाचा कापूस व सर्व जीवनावश्यक वस्तू पूर्णत: भिजून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अन् मोठा अनर्थ टळला
वादळी वाऱ्याने क्षणार्धात काही कळायच्या आत होत्याचे नव्हते झाले. चिंचोली येथील अरुणा काळे यांच्या घरी त्यांची मुलगी नुकत्याच जन्मलेल्या लहानशा लेकराला घेऊन होती. घराचे छप्पर उडेल याची कुणालाच कल्पना नव्हती. परंतु, वाऱ्याने अलगद घरावरील छप्पर उडाले. यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. वादळामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे बहुतांश ठिकाणी विजेचे खांब तुटले आणि २४ तासांपासून वीज पुरवठा खंडीत होता.
चना, गहू, मिरची, तूर पिकांचे नुकसान
बल्लारपूर तालुक्यालाही दुसऱ्यांदा वादळी पावसाचा तडाखा बसला. यात चना, गहूृ, मिरची, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अखेरच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत.

Web Title: Chappar blown up, the world opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.