चंद्रपूरचा कापूस परजिल्ह्याच्या बाजारपेठेत
By Admin | Updated: December 30, 2015 01:45 IST2015-12-30T01:45:30+5:302015-12-30T01:45:30+5:30
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी स्थानिक बाजारपेठात दराच्या मोठ्या तफावतीमुळे कापूस परजिल्ह्यात विक्रीस नेत आहे.

चंद्रपूरचा कापूस परजिल्ह्याच्या बाजारपेठेत
भावात मोठी तफावत : शेतकऱ्यांची बाजारपेठेसाठी भटकंती
जयंत जेनेकर कान्हाळगाव (कोरपना)
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी स्थानिक बाजारपेठात दराच्या मोठ्या तफावतीमुळे कापूस परजिल्ह्यात विक्रीस नेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस संकलन केंद्रातील आवक मंदावली आहे.
जिल्ह्यात कोरपना, वरोरा, चंद्रपूर, राजूरा, जिवती, भद्रावती, चिमूर तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नापिकी व नैसर्गिक संकटामुळे आधीच उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यावर वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. भाव वाढणार असे भाकीत वर्तविले जात असले तरी, रोज बाजारपेठांतील दरात बरीच तफावत दिसून येत आहे. या कारणाने व आर्थिक चणचणीमुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस वळता करणे सुरू केले आहे. परंतु जिल्ह्यात असलेल्या वरोरा, कोरपना, माढेळी, राजुरा, चंद्रपूर, चिमूर येथील बाजारपेठेत ४ हजार १०० च्या वर कापसाचा दर सरकलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस परजिल्ह्यात हिंगणघाट, वणी, आदिलाबाद, बेला, चिमणाझरी (जाम) येथे विक्रीला नेणे सुरू केले आहे. यात हिंगणघाट व चिमणाझरी (जाम) बाजारपेठेत असलेल्या दररोजच्या वाढत्या दरामुळे शेतकरी अधिक विक्रीला नेत आहेत. कोरपना व नागपूर मार्गे जिल्ह्यातील कापूस दररोजच्या दररोज ४० ते ५० मॅटडोर भरून चालला आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठा ओस अन् परजिल्ह्यातील बाजारपेठा फुल्ल दिसून येत आहेत.