किल्ला पर्यटनाला चंद्रपूरकरांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:17 IST2018-06-17T23:17:37+5:302018-06-17T23:17:37+5:30
इको-प्रोतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रपूर किल्ला पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत भल्या पहाटे किल्ला पर्यटन-हेरीटेज वॉकमध्ये सहभाग घेतला.

किल्ला पर्यटनाला चंद्रपूरकरांचा प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इको-प्रोतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रपूर किल्ला पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत भल्या पहाटे किल्ला पर्यटन-हेरीटेज वॉकमध्ये सहभाग घेतला.
१ मार्च २०१७ पासून सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानाला ४४६ दिवस पूर्ण झाले. किल्ला स्वच्छता अभियान सोबतच दुसऱ्या टप्पाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर किल्ला पर्यटनास चालना देण्यासाठी ‘हेरीटेज वॉक’ सारख्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूर किल्ला स्वच्छतेचे अभियान अंतीम टप्पात आलेले असताना आता इको-प्रोच्या वतीने नागरिकांत जनजागृती व्हावी, आपला ऐतिहासिक वारसा जवळून पाहावा, इतिहास जाणून घेता यावा, पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, चंद्रपूर शहराची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सोशल मीडियावरून येथे ‘हेरीटेज वॉक’साठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. विशेष म्हणजे हेरीटेज वॉक मध्ये सहभागी होण्यासाठी पहाटे ५.३० वाजता दाखल होत नागरिकांनी किल्ला पर्यटनासाठी उत्साह दाखविला. सध्या कुठलीही विशेष तयारी न करता, आहे त्या परिस्थितीत किल्ला पर्यटन सुरू करण्यात आले आहे. तरीही नागरिकांच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहेत. याकडे हवे तसे लक्ष पुरातत्व विभाग व प्रशासनाने दिल्यास किल्ला पर्यटन विकास योग्य पद्धतीने करणे सोईचे होणार, असे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी म्हटले आहे. सहभागी झालेल्या नागरिकांना चंद्रपूरच्या वैभवशाली गोंडराजाचा इतिहास, ऐतिहासिक वास्तुची माहिती, मंदिराची माहिती तसेच किल्लाचा इतिहास सांगून किल्लाची दुरवस्था आणि राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाची माहिती देण्यात येत आहे. त्यांनतर किल्लावरून फेरफटका मारत माहीती देण्यात आली.