वाढत्या वाहतूक कोंडीने चंद्रपूरकरांचा जीव मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:02 IST2019-06-23T00:01:39+5:302019-06-23T00:02:40+5:30

शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. मात्र मनपा गंभीर नाही.

Chandrapurkar's life met with a growing traffic congestion | वाढत्या वाहतूक कोंडीने चंद्रपूरकरांचा जीव मेटाकुटीला

वाढत्या वाहतूक कोंडीने चंद्रपूरकरांचा जीव मेटाकुटीला

ठळक मुद्देसमस्या सुटता सुटेना । शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पार्किंग झोनचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. मात्र मनपा गंभीर नाही. त्यामुळे चंद्रपुरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षात सुरळीत होऊ शकली नाही. प्रत्येक रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे चंद्रपूरकरांचा जीवही मेटाकुटीस आला आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखापर्यंत पोहचली आहे. चारचाकी व दुचाकींची संख्याही लाखोंच्या घरात आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावरून वाहने जातात आणि परतही येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. सायंकाळच्या सुमारास तर ही वर्दळ आणखी वाढते. वाहनांचे आवागमन या मार्गावरून अधिक असले तरी त्या तुलनेत पार्र्कींग झोन उपलब्ध नाहीत.
वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे किमान जिथे वाहनांचा सर्वाधिक संपर्क येतो, त्या महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गांना रुंद करणे गरजेचे आहे. चंद्रपुरात मनपा झाली तरी हे मार्ग रुंद होऊ शकले नाही. उलट अतिक्रमणामुळे अरुंदच होत चालले आहे. वास्तविक नगररचनेत हे दोन मार्ग ८० फुटापर्यंत रुंद असल्याची माहिती आहे. येथील महात्मा गांधी मार्ग, मिलन चौक, जटपुरा गेट चौक, स्टेट बँक परिसर, गोकुल गल्ली, गंजवार्ड, रघुवंशी कॉम्प्लेक्स समोर,गोल बाजार, बिनबा रोड, गांधी चौक या मुख्य ठिकाणासह शहरात अनेक ठिकाणी वाट्टेल तिथे वाहने पार्क केलेली आढळतात. त्यामुळे या ठिकाणी एखादे चारचाकी वाहन आल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होते. मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर वाहतूक समस्येमुळे त्रस्त आहेत.
‘पे अ‍ॅण्ड पार्क’कडे नागरिकांची पाठ
शहरातील पाच ठिकाणी पार्र्कींग झोन निर्माण करून ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना सुरू केली. मनपा कार्यालयाजवळ, गांधी चौकातील पश्चिम दिशेला, जुन्या महात्मा गांधी शाळा, जुन्या राजे धर्मराव प्राथमिक शाळेजवळ आणि रघुवंशी कॉम्प्लेक्समधील बेसमेंट या ठिकाणी मनपाने पार्र्कींग झोन निर्माण करून पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू केली. पण नागरिकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Chandrapurkar's life met with a growing traffic congestion