उन्हाच्या काहिलीने चंद्रपूरकर होरपळले
By Admin | Updated: May 21, 2015 01:19 IST2015-05-21T01:19:37+5:302015-05-21T01:19:37+5:30
‘हॉट सिटी’ म्हणून राज्यात ओळख आहे. चंद्रपूरचे प्रदूषण आणि चंद्रपूरचा उन्हाळा इतरांना तर सोडाच खुद्द चंद्रपूरकरांनाही नकोसा होतो.

उन्हाच्या काहिलीने चंद्रपूरकर होरपळले
चंद्रपूरची ‘हॉट सिटी’ म्हणून राज्यात ओळख आहे. चंद्रपूरचे प्रदूषण आणि चंद्रपूरचा उन्हाळा इतरांना तर सोडाच खुद्द चंद्रपूरकरांनाही नकोसा होतो. मात्र यावर्षी उन्हाळा लागल्यानंतर दीड महिना चंद्रपूरकरांना फारसे काही वाटले नाही. एप्रिल महिन्यात अनेकवेळा अवकाळी पावसाचे आगमन झाले. विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि ढगाळ वातावरण अनेक दिवस दिसून आले. त्यामुळे एरव्ही एप्रिल महिन्यात तापणारी ऊन यावेळी जाणवली नाही. त्यामुळे नागरिकही आनंदात होते. मे महिना चांगलाच तापेल, याची चंद्रपूरकरांना जाणीव होतीच. मात्र मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात दोनतीनदा अवकाळी पावसाचे आगमन झाले. काही दिवस सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होत राहिले. त्यामुळे रखरखता मे महिनाही आला तरी नागरिकांना उन्हाची तीव्रता जाणवली नाही. अशातच हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेपेक्षा काही दिवस लवकर येत असल्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळा तापणार की नाही, याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या चवीने चर्चा सुरू राहिली. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून सुर्याचा पारा चढू लागला आहे. परवा आणि काल तर सुर्याने जणू आगच ओकली असावी, असे वाटायला लागले होते. परवा म्हणजे, सोमवारी चंद्रपुरात कमाल ४५.८ तर किमान २८.२ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी पारा आणखी वाढला. या दिवशी कमाल ४६.८ तर किमान २८.१ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, आज तर कहरच झाला. सुर्याच्या पाऱ्याने आज बुधवारी ४७.४ अंशा पार मजल गाठून चंद्रपूरकरांना होरपळून टाकले. आज सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवत होती. दुपारी तर अंगाला अक्षरश: चटके बसू लागले होते. या उन्हामुळे सर्वच त्रस्त होते. (शहर प्रतिनिधी)
आजचे सर्वाधिक तापमान
यावर्षी उन्हाळा लागल्यापासून उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नव्हती.मात्र तीन दिवस सतत जिल्ह्यात तापमानात वाढ झाली. आज बुधवारी नोंदविलेले ४७.४ अंश सेल्सीयस तापमान यावर्षातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.
कुलरचा उपयोग नाही
उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी घराघरात कुलर लावले आहेत. मात्र मंगळवार आणि बुधवारी सुर्याचा पारा चांगलाच चढल्याने घरातील कुलर काम करेनासे झाले आहे. कुलर लावूनही घरात गारवा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.