एव्हरेस्टवीरांच्या अनुभवाने रोमांचले चंद्रपूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:32 IST2018-06-03T23:31:45+5:302018-06-03T23:32:01+5:30

एव्हरेस्टवीरांच्या अनुभवाने रोमांचले चंद्रपूरकर
चंद्रपूर : आदिवासीबहुल, अत्यंत दुर्गम भागातील आदिवासी मुले. ओठावर अलिकडेच मिसरूड फुटलेली. सध्याच्या स्पर्धेच्या युगातील बेरीज-वजाबाकीही अद्याप कळलेली नाही. अशा ऐन तारुण्यात जगाचे सर्वोच्च शिखर पार करून तिथे चंद्रपूर जिल्ह्याचा झेंडा फडकविणाऱ्या एव्हरेस्टवीरांचे चंद्रपुरात आगमन होताच सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी या पर्वतारोहीसोबतच उपस्थितांच्या चेहऱ्यावरही जिंकल्याचा भाव स्पष्ट दिसत होता.
विद्यार्थ्यांच्या पंखांना मिळाले बळ
एव्हरेस्टवीरांचे स्थानिक विश्रामगृहात आगमन होताच फ टाके उडवून स्वागत करण्यात आले. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दहा एव्हरेस्टवीरांना शुभेच्छा दिल्या. प्रशासनाच्या वतीने विश्रामगृहात सत्कार करण्यात आला. जिल्ह्याच्या इतिहासात एव्हरेस्ट सर करण्याची ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ठसा उमटविता येते, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच उपेक्षित आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ मिळाल्याची भावना विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी केशव बावनकर म्हणाले, मिशन शौर्य या मोहिमेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने मिशन पूर्ण होईपर्यंत एव्हरेस्टवीरांची काळजी घेतली. विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे हे फ लित आहे.
पालकांच्या चेहऱ्यावर हास्य
एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी पाल्यांची निवड झाल्याचे कळताच सुरुवातीला आम्हाला नवल वाटले. गावचे डोंगर चढणे, नदीत पोहणे यासारखे गुण आदिवासी मुलांना शिकविण्याची गरज नाही. निसर्गाच्या सानिध्यातूनच या धाडसाचे संस्कार झाले. पण, प्रशिक्षणासाठी हैदराबाद व अन्य मोठ्या शहरांमध्ये मुलांना पाठविणार असल्याची माहिती मिळाली. तेव्हाच हे काही तरी वेगळे धाडस आहे, असे वाटू लागले. मुलांनी आकाशाला भिडणाºया हिमालयाचे छायाचित्र दाखल्यानंतर आम्ही आश्चर्यचकित झालो. नागपुरातून बसमध्ये चंद्रपुरात येताना पोरांनी एव्हरेस्टबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. सरकारने मुलांचे शौर्य पाहून लाखो रुपयांचे बक्षिस दिले.
‘सेव्हन समिट’ यापुढचे लक्ष्य
जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर चढण्याचे स्वप्न हजारो ध्येयवेडे पाहतात. अनेकांना प्रयत्न करुनही पहिल्या ठप्प्यातच माघार घेण्याची हजारो उदाहरणे आहेत. स्वप्न बघणे आणि त्याची पूर्तता करणे या दोन्ही बाबी मानवी जीवनाच्या आकांक्षाचे प्रतीक असले तरी कठोर प्रयत्नाशिवाय स्वप्नपूर्ती होत नाही, हेही तेवढेच खरे. एव्हरेस्ट शिखर गाठण्याच्या प्रयत्नात शेकडो गिर्यारोहकांचा बळी गेला. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर माऊंटने पहिल्यांदा शिखर गाठले. या धाडसी गिऱ्यारोहकाचे पदोपदी स्मरण केले. या शिखरालाच माऊंट एव्हरेस्टचे नाव देण्यात आले आहे. एव्हरेस्ट शिखरानंतर ‘सेव्हन समिट’ चढण्याचे स्वप्न उराशी ठेवून आहोत. जगभरातील सात सर्वोच्च शिखरांना ‘सेव्हन समिट’ म्हटले जाते, अशी माहिती एव्हरेस्टवीर कविदास काठमोडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
एव्हरेस्टवर चढण्याचा अनुभव शब्दांच्या पलिकडचा आहे. कठोर परिश्रमानंतरच हे शिखर गाठू शकलो. शिखरावर क्षणाक्षणाला जीवघेणी संकटे पुढे आलीत. पण त्यावर मात करुन तिरंगा ध्वज फडकविला. शिखरावर चढण्याचा अनुभव लक्षात घेवूनच जीवनातील संकटावर मात करण्यास मी सज्ज राहणार आहे. यापुढे शिक्षण घेवून आयुष्य समृद्ध करणार असून आदिवासी मुलांनी शिक्षणाकडे कदापि दुर्लक्ष करू नये.
- मनिषा धुर्वे
एव्हरेस्टवर अत्यंत कठीण बर्फाळ खळक असतात. पाय ठेवण्यापूर्वी मोठी खबरदारी घ्यावी लागते. शारीरिकदृष्ट्या निरोगी असल्याशिवाय एव्हरेस्टचे आव्हान पेलणे शक्य नाही. बेस कॅम्पपासून एव्हरेस्टकडे नजर टाकलो तेव्हा जगातल्या स्वाभिमानचे हे प्रतीक असल्याचा अनुभव आला. मुळात कष्टाला घाबरण्याची सवय नसल्याने वाटले ती संकटे झेलून एव्हरेस्ट गाठले. या अनुभवामुळे आत्मविश्वास वाढला.
- कविदास काठमोडे
जगातील सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी आमची निवड झाली. तेव्हापासूनच विविध प्रकारचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. धाडसीपणा, समयसूचकता आणि ध्येयावर लक्ष ठेवून प्रचंड परिश्रम घेतले. शासनाकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. याचा एव्हरेस्ट चढताना मोठा लाभ झाला. एव्हरेस्ट सर करण्याच्या प्रत्येक ठप्प्यात काळजी घेतलीच म्हणूनच यशस्वी झालो. तेथील अनुभव ऊर्जा देणारा आहे
- विकास सोयाम
एव्हरेस्ट शिखरावर आॅक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी असते. वाºयाचेही प्रमाण कमी असून जीव गुदमरतो. शरिराचा प्रत्येक भाग सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी लागली. बर्फ अंगाला लागल्यास जखमा होतात. बेस कॅम्पपासून पुढचा प्रवास गाठताना आहाराची काळजी घेतली. ध्येयावर नजर ठेवून पुढचे पाऊल टाकले. एव्हरेस्टवर चढण्याच्या अनुभवाने नवी दृष्टी दिली. आयुष्यातील संकट पार करताना उपयोगी येणार आहे.
- उमाकांत मडावी
एव्हरेस्ट गाठल्याने आनंद झाला. प्रशिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. शिवाय सतत सराव केल्यामुळे अडचणी दूर झाल्या. सराव करताना प्रकृती सांभाळली होती. त्याचा फायदा झाला. एव्हरेस्टमुळे आयुष्याला आकार मिळण्याची शक्यता निर्माण झाली. यापुढेही मी शिक्षणासोबत धाडशी कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारने फार चांगली संधी उपलब्ध करुन दिली. या संधीचे सोने केले.
- प्रमेश आडे