चंद्रपूरची एसटी सव्वा तीन कोटींनी पंक्चर
By Admin | Updated: November 8, 2016 00:59 IST2016-11-08T00:59:39+5:302016-11-08T00:59:39+5:30
गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट तोटा : नुकसान कमी करण्यासाठी विविध प्रयत्न

चंद्रपूरची एसटी सव्वा तीन कोटींनी पंक्चर
चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागाला गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३ कोटी ३४ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा गेल्या वर्षीच्या सहामाहीच्या दुप्पट आहे. त्यामध्येही चंद्रपूर मुख्यालयातील आगार सर्वाधिक तोट्यात आहे. तर वरोरा आगाराने नफा कमविला असल्याची माहिती विभागीय नियंत्रक के. एम. सहारे यांनी दिली.
चंद्रपूर विभागातर्फे एस.टी. वर्कशॉमध्ये विभागीय नियंत्रक सहारे यांनी पत्रकारांशी संवाद आयोजित केला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, एस. टी.च्या एकूण खर्चापैकी ३५ टक्के खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि ३५ टक्के खर्च बसेसला लागणाऱ्या डिझेलवर होत असतो. उर्वरित ३० टक्क्यामध्ये सर्व काही केले जाते. याशिवाय काही सामाजिक जबाबदाऱ्या म्हणून एस. टी.ला उपक्रम चालवावे लागतात. विविध योजना राबवाव्या लागतात. त्यामुळे हा तोटा होत असतो. तरीही एस. टी.ने खासगी वाहतुकीच्या तुलनेत विश्वसनीयता निर्माण केली आहे. त्या विश्वसनीयतेच्या भरोशावर तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच बसमध्ये लागणारे डिझेल बचत व्हावी, यासाठी बसची गती बांधण्यात आली आहे. बसमधील भारमान वाढावे, यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी चंद्रपूर विभागाला एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १ कोटी ५७ लाख रुपये तोटा सहन करावा लागला. याच कालावधीत यावर्षी तो ३ कोटी ३४ लाख रुपयांर गेला आहे. वरोरा वगळता इतर आगार तोट्यात सुरू आहेत. चंद्रपूर मुख्यालय असल्याने तेथे उच्च वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारी अधिक आहेत. त्यामुळे या आगाराचा तोटा अधिक दिसतो, अशी पुस्तीही सहारे यांनी जोडली.
चंद्रपूर विभागामध्ये चंद्रपूर, राजुरा, चिमूर व वरोरा या चार आगारांचा समावेश आहे. मूल, बल्लारपूर, भद्रावती, गोंडपिपरी, सिंदेवाही व घुग्घुस येथे अद्यावत बसस्थानके असून १३३ प्रवासी निवारे प्रवाशांच्या सेवेत आहेत. ५५० चालक, ४६० वाहक, ३३६ यांत्रिक अणि २७० प्रशासकीय कर्मचारी ३१५ मार्गांवर सेवा देत आहेत. या विभागासाठी ३०० वाहने उपलब्ध आहेत. दररोज ९० हजार किलोमीटरच्या माध्यमातून सरासरी ८५ हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते. मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत ७७ बसेस चालविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
तोटा कमी करण्यासाठी नवीन उपक्रम
एस.टी.चे भारमान वाढावे, यासाठी नवीन उपक्रमाअंतर्गत मार्कंडा, वढा, चैत्र पौर्णिमा, महाकाली यात्रोत्सव, गोदोडा यात्रा आदींकरिता एस.टी. बस सोडण्यात येत आहेत. तसेच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी चंद्रपूर शहराअंतर्गत जादा बसेस सोडण्यात येतात. रामदेगी यात्रोत्सवासाठीही जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
‘झिरो वेटिंग’ फॉर्म्युला आणणार
बसस्थानकावर प्रवाशाला बसची वाट पाहावी लागू नये, यासाठी ‘झिरो वेटिंग’ फॉर्म्युला लवकरच लागू करण्यात येणार आहे. अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या मार्गावर हा फॉर्म्युला लावण्यात येणार आहे. सिंदेवाही, शिवनी, कारवा या मार्गावर मिनीबस सुरू करण्यात येणार आहे.
चार बसस्थानकांचे नूतणीकरण
चंद्रपूर विभागातील चार बसस्थानकांचे नूतणीकरण करण्यात येत आहे. चंद्रपूरच्या बांधकामासाठी ६ कोटी २५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच बल्लारपूरसाठी १० कोटी, मूल १० कोटी आणि वरोरा बसस्थानकाच्या बांधकामासाठी ७० लाख रुपये प्राप्त झाले. बल्लारपूर आणि मूल येथील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चंद्रपूर येथे नवीन बसस्थानकामध्ये तळमजल्यावर प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. हे बसस्थानक अद्यावत राहणार आहे.
एटीएम व औषधी दुकानांचा प्रस्ताव
नवीन बसस्थानकाचे बांधकाम करताना प्रवाशांच्या सुविधेसाठी एटीएम मशिन लावण्याचा प्रस्ताव आहे. प्रथमच ही सुविधा बसस्थानकावर उपलब्ध होणार आहे. याशिवाय बसस्थानकावर औषधीची दुकाने नाहीत. औषधी दुकानाबाबतही विचार करण्यात येत आहे.