समाजहिताच्या कार्यक्रमात चंद्रपूर प्रथम असावे
By Admin | Updated: September 3, 2016 00:32 IST2016-09-03T00:32:33+5:302016-09-03T00:32:33+5:30
समाजाच्या हिताचे कोणतेही कार्यक्रम राबविताना राज्याचे अथवा देशाचे न समजता ते समाज हिताचे कार्यक्रम समजून...

समाजहिताच्या कार्यक्रमात चंद्रपूर प्रथम असावे
सुधीर मुनगंटीवार : महाअवयवदान अभियानाचा समारोप
चंद्रपूर : समाजाच्या हिताचे कोणतेही कार्यक्रम राबविताना राज्याचे अथवा देशाचे न समजता ते समाज हिताचे कार्यक्रम समजून जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा. अशा सामाजिक हिताच्या कार्यक्रमात आपला चंद्रपूर जिल्हा प्रथम राहावा, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित महाअवयवदान जनजागृती अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक पी.एम.मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यु.व्ही.मुनघाटे व आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रमोद बांगडे उपस्थित होते.
यावेळी ना. मुनगंटीवार यांनी महाअवयवदान जनजागृती अभियान कार्यक्रम हा तीन दिवसांचा नसून संपूर्ण ३६५ दिवस राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या अवयवदान अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करुन समाजाला जागृत केल्याने एका माणसापासून आठ व्यक्तींचे प्राण वाचू शकते. अशा अभियानामध्ये मोठया संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हे अवयवदान एक महान कार्य असून एका मृत व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जीवन देण्याइतके दुसरे कोणतेही पुण्याचे काम असू शकत नाही. याची जाण ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही अवयवदानाची चळवळ संपूर्ण देशात उभारली असल्याचेही ते म्हणाले. या अवयवदान अभियानाच्या जनजागृतीनिमित्त घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम कविता बिशोई, द्वितीय प्रणय वानकर, तृतीय सुरज गुरनुले यांना तर निबंध स्पर्धेत प्रफुल मेश्राम, निकिता ठेंगणे व राहुल काळे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले. रांगोळी स्पर्धेत प्रतिभा राठोड, मुयरी वाघडे व प्रिया गिरी यांना पारितोषिक मिळाले. (प्रतिनिधी)