चंद्रपूर-पुणे वातानुकुलित बसचा शुभारंभ
By Admin | Updated: August 18, 2016 00:32 IST2016-08-18T00:32:11+5:302016-08-18T00:32:11+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चंद्रपूर-पुणे वातानुकुलित स्कॅनिया बस बुधवारपासून सुरु करण्यात येत आहे.

चंद्रपूर-पुणे वातानुकुलित बसचा शुभारंभ
सुधीर मुनगंटीवार : दर कमी करणार
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चंद्रपूर-पुणे वातानुकुलित स्कॅनिया बस बुधवारपासून सुरु करण्यात येत आहे. या बसचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज बुधवारी शुभारंभ करण्यात आला.
यावेळी विभाग नियंत्रक कार्तिक सहारे, विभागीय वाहतूक अधिकारी निलेश बेलसरे, आगार व्यवस्थापक विजय कुळे, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, प्रमोद कडू, वनिता कानडे, अंजली घोटेकर, तुषार सोम, रामपाल सिंह, सुभाष कासनगोटूवार उपस्थित होते.
ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शहरामधील व जिल्हयातील कर्मचारी, व्यापारी व पुणे येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच नागरिकांनी आपणाकडे वारंवार निवेदने देऊन चंद्रपूर-पुणे बस सुरु करावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करुन संबंधित विभागाशी चर्चा करून आज चंद्रपूर-पुणे वातानुकूलीत स्कॅनिया बस सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचा विचार करुन चंद्रपूर-पुणे रेल्वे सुरु करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बसचे सध्याचे तिकीट दर कमी करण्यासाठी आपण संबंधित विभागाशी चर्चा केली असून लवकरच तिकीटाचे दर कमी करण्यात येईल. महामंडळाच्या बसेस या गरीब व सामान्य जनतेचे वाहन असल्याने या बसस्थानकामध्ये चांगल्या सोईसुविधा निर्माण करण्यासाठी आपण १२५ कोटी रुपये महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाला दिले आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)