चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी - सुधीर मुनगंटीवार
By साईनाथ कुचनकार | Updated: May 30, 2023 15:36 IST2023-05-30T15:35:25+5:302023-05-30T15:36:08+5:30
खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी - सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकसंवेदना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
‘खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे, अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना माता महाकाली चरणी करतो’, अशा शब्दात ना. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त केली.