दुग्ध उत्पादनात धवलक्रांती घडविण्याची चंद्रपूरला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:46 IST2018-02-16T00:46:29+5:302018-02-16T00:46:51+5:30
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी हा प्रकल्प याच प्रयत्नांचा भाग असून जिल्ह्यात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे.

दुग्ध उत्पादनात धवलक्रांती घडविण्याची चंद्रपूरला संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी हा प्रकल्प याच प्रयत्नांचा भाग असून जिल्ह्यात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे. अधिकाऱ्यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ना. अहीर म्हणाले, सध्या जिल्ह्यात १५ हजार लीटर दुध संकलनाचे काम सुरु असून यामध्ये उतरोत्तर वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी व दूध उत्पादक संकलन केंद्रातील संचालकांच्या समस्या सोडविण्याकडेही लक्ष दिले जात आहे. मात्र, विविध खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी.
जिल्ह्यात दुधाळू जनावरांच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुधन विविध शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करून गरजू शेतकºयांना लाभ मिळवून दिला पाहिजे, यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रयत्न करावे, याकडे ना. अहीर यांनी लक्ष वेधले. यावेळी दुधातील फॅटविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना मुद्रा योजनेमधून कर्ज उपलब्ध करावे, असे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले. केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज उपलब्ध करुन देण्याचा विक्रम पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सर्व बँकांनी याबाबतीत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच ज्या ठिकाणी महिलांकडून कर्जाची मागणी झाली. तिथे प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याविषयी चर्चा झाली.
ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांना कृषिपूरक योजनेतून विकास करता येतो. त्यासाठी तालुका, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची जिल्ह्यात कशी स्थिती आहे, यासंदर्भातही आढावा बैठकीत चर्चा झाली.
गरजूंना लाभ द्या
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील शेतकºयांना जोड व्यवसाय मिळावा, यासाठी दुग्ध व्यवसायाला महत्त्व देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती आणि पूरक व्यवसाय उभारण्यास बँकांनी अडवणूक करू नये, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. या आढावा बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.