चंद्रपूरला देशात उत्तम जिल्हा करणार

By Admin | Updated: August 17, 2016 00:31 IST2016-08-17T00:31:03+5:302016-08-17T00:31:03+5:30

१५ आॅगस्ट हा आपल्यासाठी केवळ राष्ट्रीय सण किंवा उत्सव नसून हजारों शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचा जो मंगल कलश आपल्या हाती दिला आहे,..

Chandrapur has the best district in the country | चंद्रपूरला देशात उत्तम जिल्हा करणार

चंद्रपूरला देशात उत्तम जिल्हा करणार

मुख्य ध्वजारोहण सोहळा : सुधीर मुनगंटीवार यांचा संकल्प
चंद्रपूर : १५ आॅगस्ट हा आपल्यासाठी केवळ राष्ट्रीय सण किंवा उत्सव नसून हजारों शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचा जो मंगल कलश आपल्या हाती दिला आहे, त्याकडे कोणीही वाईट नजरेने बघू नये, यासाठी संकल्प करण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन करत चंद्रपूर जिल्हा देशातला उत्तम जिल्हा म्हणून नावारूपास आणण्याचा संकल्प राज्याचे वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला आ. नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक डॉ. संदीप दीवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, जि.प.उपाध्यक्षा कल्पना बोरकर, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, रामपाल सिंह, तुषार सोम, अंजली घोटेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढयात चंद्रपूर जिल्हयाचे मोठे योगदान आहे. चिमूर परिसरातूनसुध्दा शहीदांनी या लढयात योगदान देत प्राणांची आहुती दिली आहे. गेल्या दीड वर्षात राज्य सरकारच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयाच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत.
‘देव बोलतो बाल मुखातून’ या उक्तीप्रमाणे जिल्हयातील अंगणवाडया सुंदर करण्याचा निर्धार आपण केला आहे. अंगणवाडयांमध्ये सीएसआर निधीच्या माध्यमातुन रेडीओ व स्पीकर्सचे वितरण करण्यात आले आहे. ५२ आठवडयांसाठी ५२ कार्यक्रमांच्या प्रसारणाचे नियोजन सुध्दा करण्यात आले आहे.
येत्या अडीच वर्षात चंद्रपूरची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या पुनरूज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून ५३५ कोटी रुपयांचा निधी खर्चुन देशातले अत्याधुनिक रूग्णालय उभारण्याचा संकल्प आम्ही केला आहे. चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर विसापूर गावानजिक १२२ एकर जागेमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून सुमारे २७२ कोटी रुपये खुर्चन सैनिक शाळा उभारण्याच्या दृष्टीने सामंजस्य करारसुध्दा झाला आहे. गेल्या १५ आॅगस्टला शब्द दिल्याप्रमाणे चंद्रपूरातील बायपास रोडवर ५० एकर जागेमध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मृती वनउद्यानाची निर्मिती करण्यात आली असून पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ९ कोटी रुपयाचा निधी खर्चुन दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. पुढील १५ आॅगस्टला दुसऱ्या टप्प्याचे सुध्दा लोकार्पण करण्यात येईल. ताडोबा परिसरात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातुन ५० गावांची निवड करण्यात आली आहे. ४७ शाळांमध्ये शंभर खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. ६५६४ कुटुंबांना पाणी शुध्दीकरण यंत्र पुरविण्यात आले आहे. ७९ गावांमध्ये १६ हजार ३२८ कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले असून यावर्षी ३२९१ कुटुंबाना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. ध्वजारोहण समारंभास माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)

जानेवारी महिन्यात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम सुरू
शहरातील नागरिकांचे २० वषार्पासूनचे बाबुपेठ रेल्वे उडडाण पुलाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी ६३ कोटी रूपयाच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापर्यंत बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.

२०१८ पर्यंत जिल्हा
हागणदारीमुक्त करणार
गेल्या दीड वर्षात या जिल्हयात स्वच्छतेसंदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात आले आहे. २६ जानेवारी २०१८ पर्यंत चंद्रपूर जिल्हा हागणदारीमुक्त जिल्हा करण्याचा संकल्प आपण केला आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेत चित्ररथ
जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागाच्या चित्ररथांना अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या हस्ते हिरवी झेंडी देण्यात आली. चित्ररथामध्ये स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी विभाग महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, जलयुक्त शिवार, सिंचाई विभाग, समाज कल्याण विभाग, बांधकाम विभाग, पशु संवर्धन विभाग या विभागांनी स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध विभागातील योजनांची प्रचार प्रसिद्धी व्हावी, यासाठी आकर्षक असे चित्ररथ तयार करण्यात आले होते. या रथांमध्ये स्वच्छ भारत मिशनचा रथ आकर्षणाचा विषय ठरला.

जलयुक्तची आठ लाख
कामे पूर्ण
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्हयातील २१८ गावांमध्ये आठ लाख सत्तावीस कामे पूर्ण झाली आहेत. १९६३ शेतकऱ्यांनी शेततळयांसाठी अर्ज केले. त्यातील १७१६ शेततळयांच्या कामांना सुरूवात झाली आहे. ११५ शेतकऱ्यांची सावकारी कजार्तुन मुक्तता झाली असून सहा हजार ३७२ शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपये मदत आपण करणार आहोत, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Chandrapur has the best district in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.