लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० जानेवारीला कर्मवीर मा. सां. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाला चंद्रपुरात येऊन गेले. यानंतर अवघ्या १२ दिवसांत म्हणजेच दि. २२ जानेवारीला राज्य शासनाने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाचे 'कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर' असे नामाधिकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पक्षभेद विसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मा.सां. कन्नमवार यांच्या कार्याची दखल घेतली हे विशेष.
मा.सां. कन्नमवार हे महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील तरुण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीतच महत्त्वाचे निर्णय घेतो, ही बाब गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवात काढले होते. इतकेच नव्हे तर मा. सां. कन्नमवारांचे कर्तृत्व सर्वदूर पोहोचावे, यासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून गौरवग्रंथ काढण्याची घोषणाही यावेळी केली होती. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वस्तरावर स्वागत केले जात आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनीही निर्णयाचे स्वागत केले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून श्रेयाची पर्वा नाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्ष चंद्रपुरातील कार्यक्रमात राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून मा.सां. कन्नमवार यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान मोठे आहे, चंद्रपुरात निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मा. सां. कन्नमवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून हा शब्द दिला नाही; परंतु त्यांनी मागणी काँग्रेस नेत्याची असतानाही श्रेयाचा वाद बाजूला सारून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
मूल शहराचे असेही कनेक्शन राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा. सां. कन्नमवार हे मूलचे आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मूलचेच. चंद्रपूर जिल्ह्यातील एकाच शहराने राज्याला दोन कर्तृत्ववान मुख्यमंत्री दिल्याची चर्चाही या कार्यक्रमात झाली होती. यावेळी फडणवीसांनी मा.सां. कन्नमवार यांचे मुख्यमंत्री असताना केलेल्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले होते. आम्ही दोघेही एकाच शहरातले आणि या शहराने दोन मुख्यमंत्री दिले याबद्दल अभिमानही व्यक्त केला होता.